
नांदेड, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे संकल्पनेतुन नांदेड जिल्ह्यात मनरेगा योजनेंतर्गत एक लक्ष जलतारा पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील 16 तालुक्यात याबाबतची जनजागृती करण्या्साठी ग्रामपातळीपर्यंत सर्वांना मागील आठवडयात प्रशिक्षीत करण्यात आलेले आहे. याचाच पुढील टप्पा म्हणून नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण 16 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी जलतारा कामाचा शुभारंभ करण्याात आला आहे.
जिल्ह्यातील 16 तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा कामांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते भोकर तालुकातील ग्रामपंचायतीमध्ये तर उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या हस्ते लोहा व कंधार तालुकातील ग्रामपंचायतीमध्ये, विभागीय वन अधिकारी चव्हाण यांच्या हस्ते माहुर, किनवट व हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत मधे तर उपजिल्हाधिकारी रोहयो संजिव मोरे यांच्या हस्ते हदगांव व अर्धापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये, जिल्हा् अधिक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या हस्ते देगलुर व बिलोली तालुक्यातील ग्रामपंचायतीत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा अमित राठोड यांनी भोकर व मुदखेड तालुकयातील ग्रामपंचायतीत, उपसंचालक कृषी विभाग वानखेडे यांनी नायगांव व मुखेड तालुकयातील ग्रामपंचायतीमध्ये तर जिल्हा रेशिम विकास अधिकारी नरवाडे यांनी उमरी व धर्माबाद तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये जलतारा कामाचा शुभारंभ केला.
जलतारा हा शेतातील पाणी एकवटल्या जाते अशा उताराच्या ठिकाणी किंवा जेथे जमीन चिभडल्या जाते अशा ठिकाणी 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल खड्डा करून त्यात मोठे व मध्यम दगड भरून जलतारा तयार केला जातो. एका जलतारामधून सुमारे 3.60 लाख लिटर पाणी जमिनीत मुरविण्याची क्षमता आहे. ज्यामुळे विहीर, बोअरवेलचा पाणीसाठा वाढण्यास मदत होते. जलतारा हा मनरेगाच्या एनआरएम कामाच्या प्रकारामध्ये येतो. त्यामुळे अशी जलताराची कामे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनी केल्यास कामाचे कुशल व अकुशलचे प्रमाण राखता येईल व मजुरांच्या हाताला काम मिळेल व नैसर्गिक संसाधन संवर्धन करण्यास मदत होईल.
------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis