
अमरावती, 22 नोव्हेंबर (हिं.स.)जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2024-25 विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात व्याजासह जमा करणेबाबत बाबत मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष वाळके यांच्या नेतृत्वात मोर्शी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात ६ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजने अंतर्गत सन २०२४ - २०२५ या वर्षामध्ये आंबिया बहारामध्ये मोर्शी वरूड तालुक्यासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपयांचा विमा हप्ता भरून फळ पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असतांना रब्बी हंगाम संपल्यावर ४५ दिवसांत परतावा जाहीर करणे क्रमप्राप्त असतांना हंगाम संपून सहा महिने लोटले तरी ट्रिगर व परतावा जाहीर करण्यात न आल्याने संत्रा बागायतदारांना फळ पिक विमा परताव्याची प्रतीक्षा आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार कृषी विभागाने लागलेले ट्रिगर विमा कंपनीला पाठविलेले असून जिल्ह्यातील ६७ महसूल मंडळांपैकी फळ पिक विमा काढलेल्या ४७ महसूल मंडळांमध्ये ९५ ट्रिगर लागलेले असतांना सुद्धा शासन व विमा कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी विमा मदतीपासून वंचित असल्याचा आरोप रुपेश वाळके यांनी केला. युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स विमा कंपनीकडून मोर्शी वरूड तालुक्यासह अमरावती जिल्ह्यातील हजारो पात्र विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे फळ पिक विम्याचे कोट्यावधी रुपये वाटप करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे नवीन २०२५- २०२६ चा हवामानावर आधारित फळ पिक विमा काढण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागणार आहे तर काही शेतकरी आंबिया बहार विम्यावर बहिष्कार टाकणार असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पिक विमा योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शेतकऱ्यांना विमा मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या युनिव्हर्सल सोम्पो इन्शुरन्स विमा कंपनीवर कार्यवाही करून तत्काळ फळ पिक विम्याचे पैसे मंगळवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील सर्व संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांच्या तर्फे देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी