
अकोला, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।नगरपरिषद, नगरपंचायत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांची बैठक घेऊन निवडणुकीसंबंधी प्रत्येक कार्यवाही काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची तयारी, ई-भूमिती आज्ञावली, स्मार्ट व्हिजीटर प्रणाली व इतर उपक्रमांबाबत जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, यंत्रणाप्रमुख आदींच्या बैठका आज झाल्या. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे प्रत्येक बाबीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. आचारसंहिता व इतर कुठल्याही तरतुदींचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
ई- भूमिती प्रणालीबाबत आढावा
विविध महसुली कामांचा आढावाही जिल्हाधिका-यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांकडून घेतला. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, ई भूमिती प्रणाली जिल्ह्यातील जमीन व्यवस्थापनात पारदर्शकता, अचूकता आणि कार्यक्षमतेस चालना देत असून, भविष्यातील नियोजन, संसाधनांचा योग्य वापर आणि नागरिकांना वेगवान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उपयुक्त ठरते. त्या अनुषंगाने डिजीटायझेशन, उपक्रमाची व्याप्ती वाढवणे यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.नागरिकांच्या अडीअडचणी, प्रश्नांचा मागोवा घेऊन त्यांचे वेळीच निराकरण व्हावे यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ‘स्मार्ट व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टिम’ कार्यान्वित करण्यात आली आहे. अशा जलद कार्यवाही यंत्रणेची अंमलबजावणी स्थानिक स्तरावर होण्यासाठीही प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे