
मुंबई, 4 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस तथा आमदार रोहित पवार यांनी अनुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाच्या निकालावर गंभीर आरोप करत राज्य निवडणूक आयोगाला थेट लक्ष्य केले आहे. फहाद अहमद हा लोकांच्या मनातला आमदार आहे, पण मतदार यादीतील त्रुटींमुळेच त्याचा पराभव झाला असे रोहित पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
रोहित पवार यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, अनुशक्ती नगर मतदारसंघात झालेली मतदार वाढ ३८६५ आणि दुबार मतदारांची संख्या १३०८ मिळून ५१७३ होते, जी फहाद अहमद यांच्या पराभवाच्या फरकापेक्षा ३३७८ जास्त आहे. असे रोहित पवार यांनी सांगितले.
रोहित पवार बोलताना म्हणाले की, या दुबार मतदारांमध्ये केवळ मुस्लिमच नाहीत, तर हिंदू आणि उत्तर भारतीय मतदारही आहेत. आम्ही यादी तयार करताना कोणताही भेदभाव केलेला नाही, त्यांनी हेही नमूद केले की आयोगाकडे याची सर्व माहिती असूनही ते कृती करत नाहीत. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत म्हटले की दुबार मतदारांना डबल स्टार करू, पण जर तुम्हाला माहीत आहे की अशी नावं आहेत, तर त्यांची यादी जाहीर का करत नाही असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, पुढच्या दोन-तीन दिवसांत दुबार मतदारांची यादी जाहीर करा. स्वच्छ यादीशिवाय स्वच्छ निवडणुका होऊ शकत नाहीत असे आव्हान त्यांनी आयोगाला दिले.गेल्या सहा महिन्यांत ४८ लाख नवीन मतदारांची भर पडली असून ही आकडेवारी निवडणुकीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभी करते. लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर आयोगाची यंत्रणा जागी झाली आणि त्यांनी घोळ केला असेही रोहित पवार म्हणाले.
पुढे बोलताना रोहित पवार यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख करत म्हणाले की, शेलार हे विभीषण असले तरी त्यांनी सत्याची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, कर्जत जामखेड मतदारसंघात तब्बल १४ हजार दुबार मतदारांचे पुरावे त्यांनी स्वतः दिले आहेत. त्याचबरोबर शिरुर मतदारसंघात ११३३ दुबार मतदार आणि १५७८ मिसिंग नोटिस, तसेच चिंचवड मतदारसंघात तब्बल ५४६६० लोकांची घुसखोरी झाल्याचा दावा त्यांनी केला. शेजारच्या मतदारसंघातून लोक आणले गेले असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी रोहित पवारांनी देवांग दवे यांच्यावर भाजपाला माहिती पुरवण्याचा आरोप करत त्यांना या संपूर्ण कारस्थानाचा मास्टरमाइंड म्हटले. माझ्यावर जसा गुन्हा दाखल केला, तसा आशिष शेलार यांच्यावर करू नका असेही त्यांनी सांगितले. जर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल झाला, तर आम्ही आंदोलन करू असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
शेवटी रोहित पवारांनी निवडणूक आयोगाला विनंती केली की दुबार नावांची पारदर्शक यादी तातडीने जाहीर करा आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रिया राबवा, अन्यथा जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कोलमडेल. असेही रोहित पवार म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर