पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत मोठा स्फोट; 12 जण गंभीर जखमी
इस्लामाबाद, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या स्फोटात न्यायालयातील कर्मचारी आणि दुरुस्तीचे काम करणारे कामगार मिळून 12 लोक जखमी झाल्याची माहिती आह
पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत मोठा स्फोट


इस्लामाबाद, 4 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या स्फोटात न्यायालयातील कर्मचारी आणि दुरुस्तीचे काम करणारे कामगार मिळून 12 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या या स्फोटामुळे संपूर्ण इमारतीत मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कॅन्टीनमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. मात्र, नंतरच्या वृत्तांमध्ये स्फोटाचे कारण वेगळे असल्याचे समोर आले. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, हा स्फोट इमारतीच्या सेंट्रल एअर कंडिशनिंग (एसी) सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम सुरु असताना झाला. दुरुस्तीच्या कामात काही तांत्रिक बिघाड झाल्याने हा शक्तिशाली स्फोट झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

स्थानिक वृत्तानुसार, जखमी झालेल्यांमध्ये बहुतांश लोक एसी प्लांटजवळ दुरुस्तीचे काम करत होते. स्फोट होताच त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या स्फोटाच्या नेमक्या कारणांची कसून चौकशी केली जात आहे. बेसमेंटमधील हे कॅफेटेरिया केवळ सुप्रीम कोर्टाच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव असल्याचेही सांगण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande