
काठमांडू, 4 नोव्हेंबर (हिं.स.)नेपाळमध्ये दोन वेगवेगळ्या हिमस्खलनांच्या घटनांमध्ये एकूण नऊ पर्वतारोहकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन जण नेपाळी मार्गदर्शक (गाईड) आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.४) दिली.
पोलीस उप-महानिरीक्षक ज्ञानकुमार महतो यांनी सांगितले की, गौरीशंकर ग्रामीण नगरपालिकेजवळील माउंट यालुंग री (6,920 मीटर) येथे सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता हिमस्खलन झाले, ज्यात सात पर्वतारोहक दबले गेले. हे सर्वजण त्या शिखरावर चढाई करण्याचा प्रयत्न करत होते. सातही पर्वतारोहकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी एकत्रित बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.मृतांमध्ये दोन नेपाळी नागरिक, दोन इटालियन पर्वतारोहक — पाओलो कोको आणि मार्को डी मार्केलो, एक कॅनेडियन, एक फ्रेंच आणि एक जर्मन नागरिक यांचा समावेश आहे. याशिवाय तीन नेपाळी आणि दोन फ्रेंच नागरिक असे पाच पर्वतारोहक जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने काठमांडू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हिमस्खलनाच्या ठिकाणावरून आणखी चार पर्वतारोहकांना वाचवण्यात आले असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
दरम्यान, एका वेगळ्या घटनेत दोन इटालियन पर्वतारोहक — स्टेफानो फर्रोनाटो आणि अलेस्सांद्रो कपुटो हे माउंट पंबारी (6,887 मीटर) येथील कॅम्प-१ मध्ये त्यांच्या तंबूमध्ये मृतावस्थेत सापडले. हे दोघे 28 ऑक्टोबरपासून जोरदार हिमवर्षावानंतर बेपत्ता होते. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी 5,242 मीटर उंचीवरून त्यांचे मृतदेह सापडले. त्यांच्या सोबत अडकलेले आणखी एक इटालियन पर्वतारोहक वेल्टर पारालियन याला रविवारी वाचवण्यात आले.या दुर्दैवी घटनांनंतर नेपाळ पर्यटन मंडळाने आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे, “हिमस्खलनाच्या या दुर्दैवी घटनेने आम्ही अत्यंत व्यथित झालो आहोत. यालुंग री पर्वतावरील सातही पीडितांच्या कुटुंबीयांप्रती आणि मित्रपरिवाराप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode