छ. संभाजीनगर - इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट; वृद्ध महिला गंभीर
छत्रपती संभाजीनगर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। संभाजीनगर जिल्ह्यातील एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन शेजारीच बसलेली एक वृद्ध महिला गंभीर भाजली आहे. या घटनेनंतर आजूबाजूला उपिस्थत असलेल्या नागरिकांनी वृद्ध महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल क
छ. संभाजीनगर - इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट; वृद्ध महिला गंभीर


छत्रपती संभाजीनगर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। संभाजीनगर जिल्ह्यातील एका इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट होऊन शेजारीच बसलेली एक वृद्ध महिला गंभीर भाजली आहे. या घटनेनंतर आजूबाजूला उपिस्थत असलेल्या नागरिकांनी वृद्ध महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वृद्ध महिलेचे नाव मुक्ताबाई सर्जेराव पिवळ असे आहे. सदर घटना ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या आडूळ येथील बसस्थानक परिसरातील बॅटरीच्या दुकानात घडली आहे. आडूळ बसस्थानकावर शुभम उत्तमराव पिवळ यांच्या मालकीचे बॅटरी दुरुस्ती व खरेदी-विक्रीचे दुकान आहे. या दुकानात शुभम यांनी एका इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी काढून दुकानात चार्जिंगला लावली. यानंतर ते जेवण करायला बसले.

यावेळी दुकानात मुक्ताबाई पिवळ या बाजूला बसलेल्या होत्या. याचवेळी चार्जिंगला लावलेल्या बॅटरीचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटात मुक्ताबाई गंभीर जखमी झाल्या. स्फोटाचा आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी शुभम यांच्या दुकानात धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या मुक्ताबाई यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान मुक्ताबाई पिवळ यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ही घटना घडताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. तुम्हीदेखील अशा प्रकारच्या चार्जिंगवरील दुचाकी वापरत असाल तर काळजीपूर्वक वापरा आणि अशा घटनांपासून सावध राहा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande