महाविकास आघाडीने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास स्वबळावर लढणार : सतीश भिसे
परभणी, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) - बहुजन समाजाच्या न्याय, हक्क आणि सत्तेतील समभागासाठी लढणारी भिमशक्ती सामाजिक संघटना आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असून, महाविकास आघाडीकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास संघटना स्वबळावर निवडणुकीचा रणसंग्राम लढेल,”
महाविकास आघाडीने सन्मानपूर्वक जागा न दिल्यास स्वबळावर लढणार : सतीश भिसे


परभणी, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) - बहुजन समाजाच्या न्याय, हक्क आणि सत्तेतील समभागासाठी लढणारी भिमशक्ती सामाजिक संघटना आगामी निवडणुका पूर्ण ताकदीने लढवणार असून, महाविकास आघाडीकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास संघटना स्वबळावर निवडणुकीचा रणसंग्राम लढेल,” असा ठाम इशारा भिमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश भिसे यांनी दिला.

भिमशक्ती सामाजिक संघटनेची परभणी जिल्हा आढावा बैठक सावली विश्रामगृह येथे उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा. विजयकुमार सुखदेव यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभागाचे महासचिव प्रा. डॉ. प्रवीण कनकुटे उपस्थित होते. बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीवर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

संविधानवादी आणि पुरोगामी विचारसरणी असलेल्या पक्षांशी आघाडी करण्याबाबतही विचारविनिमय झाला. तथापि, महाविकास आघाडीतील पक्षांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि सन्मानजनक तिकीटवाटप केले, तरच भिमशक्ती आघाडीत सहभागी होईल; अन्यथा स्वबळावर निवडणुकीत उतरतील, असा ठराव बैठकीत एकमताने पारित करण्यात आला.

भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच “मनुवादी व संघ परिवाराच्या विचारसरणीला विरोध करून सामाजिक न्यायासाठी संघर्ष उभारण्याचा निर्धार” सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या बैठकीत परभणी जिल्ह्यातील ऑटोचालक नेते मा. राजू खरात यांनी असंख्य ऑटोचालकांसह भिमशक्ती संघटनेत प्रवेशाची घोषणा केली. तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते मा. संघरत्न हातागळे आणि त्यांची संपूर्ण टीम लवकरच भिमशक्तीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

बैठकीत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. आगामी काळात परभणीत खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या “सामाजिक ऐक्य परिषदेला” मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande