
जळगाव, 5 नोव्हेंबर (हिं.स.) जळगाव महापालिकेतील दोन माजी महापौर आणि सुमारे डझनभर माजी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे गटाची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवरच टीका केलीय. कोंडी आमची नाही तर उलट स्वतः भाजपची कोंडी झाली आहे. भाजपाला कुठलेही बाहेरून घ्यायची गरज नव्हती असं गुलाबराव पाटील म्हणाले.
मागील महापालिका निवडणुकीत भाजपकडे बहुमत असूनही काही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे पक्षाला सत्ता गमवावी लागली होती. तसेच, विधानसभा निवडणुकीदरम्यान काही नगरसेवकांनी बंडखोरीचा मार्ग अवलंबल्याचेही पाहायला मिळाले होते. सध्या भाजपात ठाकरे गटाच्या दोन माजी महापौरांसह नगरसेवकांच्या प्रवेशामुळे महायुतीचे मित्र पक्ष शिंदे गट आणि अजित पवार गटाची कोंडी झाल्याचं बोललं जात असून या पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटाची अजिबात कोंडी झालेली नाही. उलट स्वतः भाजपची कोंडी झाली आहे. भाजपला ठाकरे गटाचे नगरसेवक आपल्या पक्षात घेण्याची काहीच गरज नव्हती. आपल्याकडे कार्यकर्ते नाही आहेत का ?, आपली मशिन बंद पडली आहे का ? भाजपा आता पाईप चोरांना घेऊ की कोणाला घेवो. हा आता त्यांचा प्रश्न आहे. सलीम कुत्ताचे बॅनर विधानसभेत फडकावणारा सुधाकर बडगुजर सुद्धा भाजपमध्ये गेला. आता काय करणार त्यांच्या पक्षाचा विषय आहे तो त्यांच्या पक्षाने कुत्त्याला घ्यावं की कोणाला घ्यावं हा त्यांचा विषय आहे माझ्या पक्षाने बकरीला घ्यावं की म्हशीला घ्यावं हा माझा विषय आहे असं बोलत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपाला खोचक टोला लगावला दरम्यान, भाजपने सध्या फुटलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नगरसेवकांसाठी पक्षाची दारे अद्याप उघडलेली नाहीत. मात्र, संबंधितांचा पुनर्विचार करून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर