
जळगाव , 5 नोव्हेंबर (हिं.स.) गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या जळगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर धुळे महापालिकेच्या उपायुक्त शोभा बाविस्कर यांची बदली झाली असून त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शोभा बाविस्कर या अनुभवी प्रशासक असून त्यांनी यापूर्वी जामनेर, पाचोरा, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यानंतर शासनाने शाम गोसावी यांची नियुक्ती केली होती; मात्र चार महिन्यांपूर्वी त्यांची बदली नाशिक येथे झाल्याने उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून प्रभारी जबाबदारी सांभाळली होती.
शासनाने जारी केलेल्या बदली आदेशानुसार, धुळे महानगरपालिकेतील उपायुक्त शोभा बाविस्कर यांची जळगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव महापालिकेतील मंजूर आठ सहाय्यक आयुक्त पदांपैकी एकाही अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये प्रभारी अधिकाऱ्यांमार्फतच कामकाज सुरू असून प्रशासनावर अतिरिक्त जबाबदारीचा ताण कायम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर