
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। कार्तिकी वारी काळात येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी आळंदी देवस्थान, इंद्रायणीकाठी दर्शन मंडप आणि देऊळवाड्यात सीसीटीव्ही यंत्रणा उभी करण्यात आली. देवस्थानच्या वतीने दर्शनबारीतील भाविकांना २४ तास चहा, खिचडी प्रसाद, पाणी १२ नोव्हेंबर पासून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहे.
आळंदी देवस्थानच्या तयारीबाबत माहिती देताना प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ म्हणाले की, ‘‘कार्तिकी वारीसाठी साधारण ५० लाख रुपये खर्चाचे आर्थिक नियोजन देवस्थान केले जाते. इंद्रायणी काठी खासगी ५० गुंठे जागा प्रशासनाने आरक्षित केले असून त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दर्शन मंडप आणि दर्शन बारी उभारली जाणार आहे. थंडीचे दिवस असल्याने वारकऱ्यांना दर्शन बारीमध्ये थंडीचा उपद्रव होऊ नये यासाठी मंडप आणि इंद्रायणी काठच्या स्काय वाक पुलावर दोन्ही बाजूने पत्र्याचे शेड उभे करून कापडी पडद्याने दर्शनबारी झाकून घेतली जाणार आहे. संपूर्ण दर्शन मंडपात विद्युत व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात येणार आहेत. भाविकांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. दर्शन मंडपामध्ये तसेच देऊळ वाड्यामध्ये विविध ठिकाणी ग्रामीण रुग्णालयासह अन्य खासगी रुग्ण सेवा देणाऱ्या संस्थांना सोबत घेऊन औषध उपचार तसेच तपासणी करण्याची सोय केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु