
पुणे, 5 नोव्हेंबर, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली कलात्मक प्रतिभा राज्य पातळीवर दाखवून दिली आहे. मुंबई येथील म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) या प्रतिष्ठित संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील “क्रिएटिव्ह क्वोशंट आर्ट कॉम्पिटिशन” या कला स्पर्धेत महापालिकेच्या दोन विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र राज्यभरातून आलेल्या ५०० हून अधिक स्पर्धकांमधून निवडण्यात आली आहेत. ही स्पर्धा नुकतीच पार पडली. महाराष्ट्रातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
“सर्जनशीलता, कल्पकता आणि सामाजिक जाण” या तिन्ही घटकांवर आधारित या स्पर्धेत महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतीद्वारे एक वेगळा ठसा उमटवला. या स्पर्धेतील पहिल्या ५५ उत्कृष्ट चित्रांमध्ये पी.सी.एम.सी. पब्लिक स्कूल, खिंवसरा पाटील कन्या थेरगाव येथील विद्यार्थिनी दिव्या अविनाश उपर्वट, आणि छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम कासरवाडी शाळेचा विद्यार्थी वेदांत चौघुले यांनी रेखाटलेल्या चित्रांची निवड झाली आहे. आता ही चित्र मुंबईतील म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) या नामांकित संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. दिव्या उपर्वट हिने “भविष्यातील पर्यावरण आणि त्यासाठीचे उपाय” या विषयावर प्रभावी चित्र रेखाटले असून, पर्यावरण रक्षणासाठी जागृती निर्माण करणारा संदेश तिच्या चित्रातून झळकतो. तर वेदांत चौघुले याने “माझे स्वप्न” या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून' मी एक वैज्ञानिक' हे प्रेरणादायी चित्र रेखाटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु