
पुणे, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने ॲप तयार केले, अभियंत्यांना कडक कारवाईचे आदेश दिले, तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजविण्यासाठी पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्ड्यांचा शोध घेऊन ते बुजविणार आहे.‘खड्डेमुक्त पुणे अभियाना’चा प्रारंभ महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते पार पडला.या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांत पोलिस खात्याच्या सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोदाई केली होती. या कामांनंतर रस्त्यांचे व पदपथांचे पुनर्वसन न झाल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धोकादायक खड्डे, उखडलेले पदपथ आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे अभियंत्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजविणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘खड्डेमुक्त पुणे’ करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.या अभियानाचा प्रारंभ सारसबाग येथील सणस मैदानासमोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील खराब रस्त्याच्या दुरुस्तीने केला. येथे जुन्या रस्त्याचे मिलिंग करून नव्याने डांबर टाकून खड्डे बुजविण्यात आले. यानंतर शहरातील विविध भागांमध्ये ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु