
मनिला, 5 नोव्हेंबर (हिं.स.)।फिलिपिन्समध्ये आलेल्या शक्तिशाली ‘कलमागी’ वादळाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण बेपत्ता आहेत. सर्वाधिक नुकसान सेबू प्रांतात झाले आहे, जो अलीकडेच झालेल्या भीषण भूकंपातून सावरण्याचा प्रयत्न करत होता.
अधिकाऱ्यांनी सांगितले की मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे अनेक लोक आपल्या घरांच्या छतांवर अडकले. रेड क्रॉसला शेकडो फोन कॉल्स आले, ज्यात लोकांनी मदतीची हाक दिली. सेबूच्या गव्हर्नर पामेला बारिकुआत्रो यांनी सांगितले, “आम्ही बचावासाठी पूर्ण तयारी केली होती, परंतु अचानक आलेल्या पुरामुळे सर्वकाही बदलून टाकले.” त्यांनी हेही मान्य केले की दीर्घकाळ चालणाऱ्या खननामुळे आणि निकृष्ट पूरनियंत्रण प्रकल्पांमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.
वादळग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासाठी जात असताना फिलिपिन्स एअरफोर्सचा एक हेलिकॉप्टर अगुसान डेल सुर प्रांतात कोसळून सहा जवानांचा मृत्यू झाला. ‘सुपर ह्यूई’ हेलिकॉप्टर दक्षिणी अगुसान डेल सुर प्रांतातील लोरेटो शहराजवळ दुर्घटनाग्रस्त झाले. पूर्व मिन्डानाओ लष्करी कमांडने आपल्या प्राथमिक निवेदनात म्हटले की, हेलिकॉप्टरमधील हवाई दलातील कर्मचाऱ्यांचा शोध सुरू होता. ते वादळग्रस्त भागात मानवी मदत पोहोचवण्यासाठी तैनात करण्यात आले होते. अहवालानुसार, या दुर्घटनेत सर्व सहा कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत.
सेबू प्रांतातील नद्या आणि नाले तुफान पावसामुळे उफाळले आहेत. अनेक भागांमध्ये घरे पूरात वाहून गेली. प्रशासनाने या प्रांताला “आपत्तीग्रस्त क्षेत्र” घोषित केले आहे, जेणेकरून मदत निधीचा वापर तातडीने करता येईल. भूकंपामुळे बेघर झालेल्या हजारो लोकांना आधीच मजबूत आश्रयस्थानी हलवण्यात आले होते, ज्यामुळे अनेकांचे जीव वाचले. गव्हर्नर बारिकुआत्रो यांनी निकृष्ट दर्जाच्या बांधकामांवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “येथील पूर नियंत्रण प्रकल्पांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे प्राण गेले, त्यांना जबाबदार धरणे आवश्यक आहे.”
‘कलमागी’ वादळ बुधवारी पालावन बेटाच्या किनारी भागांवर होते, जिथे 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत होते. हवामान विभागानुसार, वादळ आता दक्षिण चीन समुद्राच्या दिशेने सरकत आहे. आतापर्यंत 3,87,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे, तर 186 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुमारे 3,500 प्रवासी आणि ट्रकचालक बंदरांवर अडकले आहेत. फिलिपिन्स दरवर्षी सुमारे 20 वादळे आणि अनेक भूकंपांचा सामना करतो. तसेच येथे डझनभर सक्रिय ज्वालामुखी असल्यामुळे हे जगातील सर्वात आपत्तीप्रवण देशांपैकी एक मानले जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode