
नवी दिल्ली , 10 डिसेंबर (हिं.स.)।काँग्रेसचे खासदार शशि थरूर यांनी वीर सावरकर पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. थरूर यांनी हेही सांगितले की त्यांच्या संमतीशिवाय त्यांचे नाव जाहीर करणे ही आयोजकांची गैरजबाबदार कृती आहे.मात्र आयोजक संस्था एचआरडीएस इंडियाचा दावा आहे की, थरूर यांना आधीच माहिती देण्यात आली होती आणि ते राजकीय दबावामुळे मागे हटले आहेत.
दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना थरूर म्हणाले की त्यांना या पुरस्काराबद्दल मंगळवारीच समजले आणि ते पुरस्कार समारंभाला जाणार नाहीत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,“मी वी. डी. सावरकर यांच्या नावाने दिला जाणारा कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही आणि अशा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही.”
मात्र पुरस्कार देणाऱ्या हाई रेंज रूरल डेवलपमेंट सोसायटी (एचआरडीएस) इंडिया चे सचिव अजी कृष्णन यांनी एका टीव्ही चॅनेलला सांगितले की थरूरांना या बाबतची माहिती खूप आधीच देण्यात आली होती.त्यांच्या म्हणण्यानुसार, एचआरडीएस इंडिया चे प्रतिनिधी आणि पुरस्कार ज्यूरीचे अध्यक्ष थरूर यांच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रित करून आले होते. थरूर यांनी इतर पुरस्कारप्राप्तांची यादी मागितली होती, जी त्यांना देण्यात आली होती. अजी कृष्णन यांनी दावा करत म्हटले, “थरूर यांनी आम्हाला कार्यक्रमाला न येण्याबद्दल अद्याप कळवलेले नाही. कदाचित काँग्रेसने हा मुद्दा बनवल्यामुळे ते घाबरले असतील.”
यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये थरूर स्पष्ट म्हणाले, “पुरस्काराचे स्वरूप, तो कोण देत आहे किंवा इतर आवश्यक तपशील समजले नसताना, मी कार्यक्रमाला उपस्थित राहणे किंवा पुरस्कार स्वीकारणे शक्य नाही.”त्यांनी सांगितले की केरळमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मतदान करण्यासाठी गेले असताना, त्यांचे नाव या पुरस्कारासाठी जाहीर केले गेले असल्याचे माध्यमांतून कळले.
दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी बुधवारी म्हटले, “काँग्रेसचा कोणताही सदस्य—तो शशि थरूर असो वा इतर कोणी—वीर सावरकरांच्या नावाचा कोणताही पुरस्कार स्वीकारू नये.” त्यांनी कारण देताना म्हटले की सावरकरांनी ब्रिटीशांसमोर झुकाव दाखवला होता, आणि असा पुरस्कार स्वीकारणे काँग्रेससाठी अपमानास्पद व लाजिरवाणे ठरू शकते. त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले की शशि थरूर हा पुरस्कार स्वीकारणार नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode