
पालघर, 13 डिसेंबर (हिं.स.)।
मिरा-भाईंदर–वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २००७ साली घडलेल्या ५ वर्षांच्या मुलीच्या अपहरण, बलात्कार व निर्घृण हत्येच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर उत्तर प्रदेशातून अटक करण्यात गुन्हे प्रकटीकरण कक्ष–२, वसईला यश आले आहे.
माणिकपूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२३/२००७ भादंवि कलम ३०२, ३६३, ३७६ अन्वये हा गुन्हा नोंद आहे. फिर्यादी बाबुलाल जगईप्रसाद गौतम (रा. यादव कंपाऊंड, सातिवली, वसई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ मार्च २००७ रोजी रात्री ११ ते १ एप्रिल २००७ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी नंदलाल उर्फ नंद विश्वकर्मा याने चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांची ५ वर्षीय मुलगी गीतादेवी हिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून मारहाण करत गळा आवळून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.
पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार उघडकीस न आलेल्या खुनांच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू करण्यात आला. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष–२, वसईने नव्याने तपास करत घटनास्थळी उपस्थित असलेल्या साक्षीदारांकडून माहिती घेतली. तसेच गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून आरोपी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील ईटावा तालुक्यातील खरदौरी गावात लपून राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे तपास पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले. अखेर १० डिसेंबर २०२५ रोजी आरोपी नंदलाल उर्फ नंद विश्वकर्मा याला अटक करण्यात आली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा कक्ष–२ वसईचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या गुन्ह्याची उकल झाल्याने पोलिसांच्या तपासकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL