
धुळे, 15 डिसेंबर (हिं.स.)राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका मोठा वाढला असल्याचा दिसून येत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. थंडीची लहर आणि दाट धुके सकाळच्या वेळी अनुभवायला मिळत आहे. वाढत्या थंडीपासून काहीसा दिलासा येत्या काही दिवसात मिळण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होऊन किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात येत्या 7 दिवसांत तापमानात विशेष बदल होणार नाही, पण काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. धुळे, जेऊर, निफाड, परभणी या चार जिल्ह्यांमध्ये अति थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये 5-6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली आहे. शिवाय ला निनामुळे जानेवारीपर्यंत ही थंडी कायम राहणार आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या उत्तरेकडील राज्यांमध्ये दाट धुक्याची चादर कायम राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील तापमान सहा अंशावर येऊन ठेपले असून जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीत वाढ झाली आहे, या थंडीचा परिणाम जनजीवनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दिवसभर थंडीची हुडहुडी जाणवत आहे, या थंडीमुळे सकाळी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील काही प्रमाणात कमी झाल्याचे पाहायला मिळत असून पुढील काही दिवसात तापमान आणखीन खाली येणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर आणि सातारा या भागांमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. महाबळेश्वरमधील गारठ्याचा परिणाम पुण्यातही जाणवत असून पुण्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पुण्यातील तापमान सातत्याने घसरत असून, महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. पुण्यात दिवसेंदिवस तापमानात घट होत असल्याने पुणेकरांना गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे.महाबळेश्वरच्या तुलनेत साताऱ्यात थंडीचा प्रभाव अधिक वाढला आहे. तापमानात वाढत्या घटेमुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. साताऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमान झपाट्याने घसरत असून, प्रथमच महाबळेश्वरपेक्षा अधिक थंडी साताऱ्यात जाणवत आहे. सध्या महाबळेश्वरमध्ये तापमान 10 अंश सेल्सिअस असताना, साताऱ्यात ते 9 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. त्यामुळे साताऱ्यात ‘मिनी काश्मीर’सारखा अनुभव नागरिक घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर