
सोलापूर, 15 डिसेंबर (हिं.स.)।
हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार AI ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार AI ॲप डाउनलोड करा आणि शेतीत डिजिटल क्रांतीचा भाग व्हा,” असे आवाहन शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सोलापूर यांनी केले.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले की, हे ॲप शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम हवामान अंदाज, बाजारभाव, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पद्धतींचे मार्गदर्शन करते.
ॲपची वैशिष्ट्ये:
- AI चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो.
- स्थानिक हवामान अंदाजामुळे पेरणी, कापणी व खतांचा वापर यांचे नियोजन शक्य होते.
- बाजारभावाची रिअल टाइम माहिती उपलब्ध होते.
- कृषी योजनांचे तपशील, अनुदान व विमा योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते.
- मराठीत व्हिडिओ मार्गदर्शनाद्वारे लागवड, खतांचा वापर, कापणी व जैविक शेतीचे मार्गदर्शन मिळते.
- पिकांचे फोटो अपलोड करून रोग व किडींचे निदान करून उपाय मिळवता येतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड