
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)
- वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (एआयएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे रशियातील व्यावसायिक प्रतिनिधी मंडळासोबत संवादात्मक बैठक (इंटरॲक्टिव्ह राऊंडटेबल मीटिंग) आयोजित करण्यात आली. या परिषदेमुळे भारतीय उद्योगांना रशियन कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची, सहकार्याच्या संधी शोधण्याची आणि दीर्घकालीन व्यापार भागीदारी निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली.
या परिषदेस वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री, रशियातील दक्षिण निर्यात सहाय्यता केंद्राच्या प्रतिनिधी इरिना मलाहोवा, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्रेड प्रमोशन आणि डेव्हलपमेंट संचालक प्रिया पानसरे तसेच उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. विजय कलंत्री म्हणाले की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर उभय देशांतील व्यापार संबंधांना नवे बळ मिळाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला रशियन व्यापार प्रतिनिधींकडून सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भारतात विशेषतः महाराष्ट्रात व्यापाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. भारतीय भांडवली बाजारातील रशियन गुंतवणूक, अणू व संरक्षण क्षेत्रातील अत्यावश्यक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि संयुक्त उपक्रम यांमुळे २०२७ पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
इरिना मलाहोवा म्हणाल्या, भारत आणि रशिया यांच्यात दीर्घकाळापासून दृढ आर्थिक व व्यापारी भागीदारी आहे. ही भागीदारी अधिक मजबूत करणे आणि रशियन उद्योगांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश सुलभ करून देणे तसेच निर्यात प्रोत्साहन व व्यवसाय संधी देणे हा परिषदेचा मुख्य उद्देश असून रशिया आणि भारत यांच्यात फलदायी द्विपक्षीय संबंध निर्माण होतील. त्यांनी यावेळी रशियातील व्यापार व निर्यात संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या परिषदेमुळे भारत–रशिया व्यापार संबंध अधिक मजबूत होतील तसेच भारतीय उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. परिषदेदरम्यान दोन्ही देशांतील उद्योजकांनी विविध क्षेत्रांतील धोरणे, संधी, आव्हाने आणि भविष्यातील सहकार्याबाबत सखोल चर्चा करत परस्पर संवाद साधला.
या परिषदेत भारतातील अन्न व पेय (एफ अँड बी), आतिथ्य (हॉस्पिटॅलिटी), किरकोळ (रिटेल), कोल्ड-चेन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. उभय देशांतील विविध क्षेत्रांतील उद्योग प्रतिनिधींमध्ये सखोल चर्चा झाली. या परिषदेत १५० हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते. रशियन शिष्टमंडळासाठी संरचित बी टू बी बैठका आयोजित करण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी