
अॅडलेड, 18 डिसेंबर (हिं.स.)ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अॅडलेड ओव्हल येथे सुरू आहे. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३७१ धावांपर्यंत मजल मारली आहे. यानंर कांगारुंच्या गोलंदाजांनी भेदक मारात करत इंग्लिश संघाला अडचणीत आणळे आहे. कर्णधार पॅट कमिन्स तीन, नॅथन लायन दोन आणि स्कॉट बोलँडने दोन विकेट्स घेतल्या. यामुळे इंग्लंडने दिवसअखेर 8 बाद २१३ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ ऑस्च्रेलियाच्या अजूनही १५८ धावांनी पिछाडीवर आहे. तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे. तर ऑस्ट्रेलियाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कने ३३ आणि नॅथन लायनने शून्य धावांवर आपला डाव सुरू केला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ८ बाद ३२६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी स्टार्कने फलंदाजीतून आपली ताकद दाखवत जोफ्रा आर्चरचा यशस्वी सामना केला आणि ७५ चेंडूत 9 चौकारांसह ५४ धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात एकूण ३७१ धावा केल्या. इंग्लंडकडून आर्चरने पाच विकेट घेतल्या, तर ब्रायडन कार्सने दोन विकेट्स घेतल्या.
इंग्लंडची पहिल्या डावात सुरुवात अत्यंत खराब झाली. तिसऱ्या कसोटीत परतणाऱ्या ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम सलामीवीर झॅक क्रॉली (९) ला स्वस्तात बाद केले. त्यानंतर नॅथन लायनने बेन डकेट (२९) ला क्लीन बोल्ड करून त्याची ५६४ वी कसोटी विकेट घेतली. यासह, लायन ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ग्लेन मॅकग्रा (५६३) ला मागे टाकले. तर शेन वॉर्न ७०८ कसोटी विकेट्स अव्वल स्थानावर आहे.
कर्णधार कमिन्सने धोकादायक जो रूटला 19 धावांवर बाद करत इंग्लंडला आणखी अडचणीत टाकले. रूटला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा बाद करणारा तो पहिला गोलंदाज बनला आहे. त्याने रुटला १२ वेळा बाद केले आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स वगळता इतर कोणताही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. सातत्याने विकेट्स पडत गेल्याने इंग्लंडने दिवसअखेर 8 बाद २१३ धावांपर्यंत मजल मारली होती. बेन स्टोक्स १५१ चेंडूत ४५ धावा करत नाबाद आहे. त्याच्या खेळीत तीन चौकारांचा समावेश होता, तर जोफ्रा आर्चर ४८ चेंडूत ३० धावांवर नाबाद आहे. इंग्लंडला पुनरागमन करण्यासाठी ३०० धावांचा टप्पा ओलांडावा लागेल. ऑस्ट्रेलियाचा उद्देश इंग्लंडला लवकर बाद करून सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यावर असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे