
टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवेची 323 धावांची विक्रमी भागीदारी
वेलिंग्टन, १८ डिसेंबर (हिं.स.) डेव्हॉन कॉनवे (नाबाद १७८) आणि टॉम लॅथम (१३७) यांच्या शानदार आणि संयमी शतकांमुळे, पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. दोन्ही सलामीवीरांनी पाहुण्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही आणि संघाला मजबूत स्थितीत आणले.
न्यूझीलंडच्या टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉनवे यांनी इतिहास रचला. न्यूझीलंडच्या डावात त्यांनी पहिल्या विकेटसाठी ३२३ धावांची विश्वविक्रमी भागीदारी केली. न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात किवी सलामीवीरांनी ३०० किंवा त्याहून अधिक धावांची सलामी भागीदारी करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, १९७२ मध्ये, टेरी जार्विस आणि ग्लेन टर्नर यांनी जॉर्जटाऊनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३८७ धावांची सलामी भागीदारी केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सलामी भागीदारीचा विश्वविक्रम ग्रॅमी स्मिथ आणि नील मॅकेन्झी यांच्या नावावर आहे. २००८ मध्ये बांगलादेशविरुद्ध चितगाव कसोटीत त्यांनी ४१५ धावांची सलामी भागीदारी केली होती.
बे ऑफ प्लेंटी मैदान, त्याच्या नावाप्रमाणेच, या दिवशी न्यूझीलंडसाठी फलदायी ठरले. वेस्ट इंडिजने ३० वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना जिंकण्याचे स्वप्न घेऊन स्पर्धेत प्रवेश केला होता. पण जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसे ते स्पर्धेपासून दूर गेले. दिवसभर विक्रम आणि आकडेवारीच्या गर्दीत, रोस्टन चेसच्या नेतृत्वाखालील संघाने केवळ प्रेक्षकांसारखी बघ्याची भूमिका घेतली.
या मैदानावर खेळल्या गेलेल्या मागील पाच कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या सत्रात विकेट्स पडल्या होत्या. पण यावेळी तसे झाले नाही. न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विल्यमसनला फलंदाजीसाठी सर्वात जास्त वेळ वाट पाहावी लागली. सलामीची जोडी कमालीच्या फॉर्ममध्ये त्यामुळे विकेट पडण्याची चिन्हे नव्हती.
टॉम लॅथमने नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला, जो पूर्णपणे बरोबर ठरला. शांत आणि संयमी खेळ करत त्याने आपले १५ वे कसोटी शतक पूर्ण केले. या खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ६,००० धावाही पूर्ण केल्या आहेत. लॅथम स १३७ धावांवर बाद झाला.
दुसरीकडे, डेव्हॉन कॉनवेने आपल्यावर होत असलेल्या टीकेवर मात केली आणि जोरदार पुनरागमन केले. गेल्या काही सामन्यात त्याला चांगली सुरुवात मिळून त्याचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयश आले होते. पण त्याने गवताळ खेळपट्टीवर उल्लेखनीय संयम दाखवला. सुरुवातीच्या कठीण टप्प्यानंतर, त्याने धावगती वाढवली आणि चार वर्षांपूर्वी लॉर्ड्सवर त्याच्या द्विशतकानंतरचा त्याचा सर्वात मोठा कसोटी डाव खेळला. दुखापती आणि क्रॅम्प असूनही कॉनवेने फलंदाजी सुरू ठेवली आणि दिवसाच्या शेवटी तो १७८ धावांवर नाबाद राहिला.
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना खेळपट्टीवरून काही मदत मिळाली. पण ते सातत्याने त्याचा फायदा उठवू शकले नाहीत. अँडरसन फिलिप आणि इतर गोलंदाजांनी काही उत्कृष्ट चेंडू टाकले. पण शिस्तीच्या अभावामुळे त्यांना विकेट घेता आल्या नाहीत.दिवसअखेरीस न्यूझीलंडने १ बाद ३३४ धावा केल्या आहेत. आणि सामन्यावर आपले पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे