
नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.)।
नांदेड येथील आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्यासाठी आपण स्वतः उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांकडे मागणी व शिफारस करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले.
मंगेश चिवटे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गरजू व सामान्य नागरिकांसाठी आरोग्यसेवा पोहोचवण्याचे काम केले आहे. हजारो रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय असून अशा सेवाभावी नेतृत्वाला विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे मत आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केले.
“जनतेसाठी झटणारे, पक्षाशी निष्ठावान आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व विधिमंडळात गेले पाहिजे. त्यामुळे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्यासारख्या कार्यकर्त्याला राज्यपाल कोट्यातून आमदार करण्यासाठी मी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे आग्रह धरणार आहे,” असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
या घोषणेमुळे शिवसैनिकांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आरोग्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाभावी कार्यकर्त्याला मोठा सन्मान मिळावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis