
अकोला, 19 डिसेंबर (हिं.स.)
2011 साली कारंजा येथील एका युवकाने पैगंबर मोहम्मद साहब यांच्याबद्दल एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकद्वारे प्रकाशित करून अवहेलना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ अकोला शहरात काही सामाजिक संघटनांनी दिनांक 28/11/2011 रोजी बंदचे आयोजन केले होते. तत्कालीन सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी या आंदोलनादरम्यान एक तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार, मुस्लिम नुमाइंदा कौन्सिलने आयोजित केलेल्या बंद दरम्यान, तिलक रोडवरील मुख्य बाजारपेठेत काही लोकांनी घोषणाबाजी केली, दुकानांमध्ये लूटपाट केली, मारहाण करून लोकांना जखमी केले आणि वाहनांची तोडफोड केली. या आरोपांखाली सुमारे 59 लोकांविरुद्ध FIR दाखल करण्यात आली होती. आरोपींविरुद्ध भा.दं.वि. (IPC) च्या कलम 397, 395, 394, 143, 147, 148, 149, 323, 324, 336, 337, 427, 120 (ब) सह 'डेमेज टू पब्लिक प्रॉपर्टी' कायद्याचे कलम 3, 4, 'क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट'चे कलम 7 आणि मु.पो. अधिनियमचे कलम 135, 140 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. चार्जशीट दाखल झाल्यानंतर, या प्रकरणाची सुनावणी विद्यमान प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. श्रीसागर यांच्या कोर्टात झाली. विद्यमान कोर्टाने तक्रारदार तसेच तपास अधिकारी असलेल्या विलास पाटील यांच्यासह एकूण 5 साक्षीदारांची तपासणी केली. मात्र, पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावी, कोर्टाने सर्व 59 आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले. 45 आरोपींच्या वतीने जेष्ठ फौंजदारी वकील ॲड. नजीब शेख यांनी बाजू मांडली, त्यांना ॲड. शिबा मलिक, ॲड. सोहराब जागीरदार आणि ॲड. सय्यद अरबाज यांनी सहकार्य केले. 'वहादत-ए-इस्लामी हिंद' या स्वयंसेवी संस्थेने गरीब व मजूर आरोपींना कायदेशीर मदत पुरवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे