
अकोला, 19 डिसेंबर (हिं.स.)।
जिल्ह्यातील विविध कृषी प्रकल्प, कृषी योजनाधारित व्यवसाय प्रकल्प आदींची जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज पाहणी केली.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी कुंभारी येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन व इतर गळीतधान्य प्रकल्पाअंतर्गत शेत बांधावरील जैविक निविष्ठा प्रयोगशालेला भेट देऊन पाहणी केली. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाअंतर्गत फळबाग लागवडीची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे , प्रकल्प संचालक आत्मा मुरली इंगळे , उप विभागीय कृषी अधिकारी विवेक बिऱ्हाडे , तालुका कृषी अधिकारी विलास वाशीमकर उपस्थित होते.
*बोदडे डेअरीला भेट*
जिल्ह्यातील मौजे वणी रंभापूर तालुका अकोला येथील बोदडे डेअरीला जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी भेट दिली. डेअरी चे व्यवस्थापक मयूर बोदडे यांनी कृषि विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अर्ज लाभ घेतला असून स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बोरगाव मंजू या बँकेमार्फत त्यांना अर्थसहाय्य देण्यात आले आहे, या योजनेंतर्गत त्यांना प्रकल्प खर्चाच्या ३५ टक्के अनुदान रक्कम ३ लक्ष ८५ हजार रु मिळाले आहे.
दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी श्री. बोदडे यांनी आधुनिक मशिनरीज खरेदी केल्या असून सदर मशिनरीज च्या सहायाने ते त्यांच्या डेअरी मध्ये लस्सी, दही, पेढा, श्रीखंड इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करतात, तसेच विशेष पॅकिंग मध्ये उत्पादित माल जिल्ह्यातील विविध ठिकाणी विक्री करतात. जिल्हाधिकारी यांनी उत्पादनाच्या ठिकाणाची, यंत्रसामुग्री तसेच उत्पादित मालाच्या गुणवत्तेची पाहणी केली आणि उद्योजकाच्या कार्याचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे