
जळगाव , 19 डिसेंबर (हिं.स.) जामनेर येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले असून, मित्रांतील जुन्या वादातून ही निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरात गळा दाबून हत्या करून मृतदेह पोत्यात बांधून नेव्हरे धरणात फेकून दिल्याची कबुली संशयितांनी दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश राजेंद्र कासार (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. निलेश हा आई-वडील व बहिणीसोबत जामनेर येथे वास्तव्यास होता. सोमवार दि. १५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून तो बेपत्ता झाल्याची तक्रार जामनेर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. दरम्यान, निलेश हा जळगाव शहरातील एलटीआय फायनान्स कंपनीत कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. याच कंपनीत काम करणारे दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ता. एरंडोल) व भूषण बाळू पाटील (वय २०, रा. पिंपरी, ता. चोपडा) हे दोघेही सध्या जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मामाकडे राहत होते. कामाच्या ठिकाणी या तिघांमध्ये मैत्री झाली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून निलेश व भूषण यांच्यात वाद झाला होता. त्या भांडणाची मनात खुन्नस ठेवून भूषण पाटील संधीच्या शोधात होता. दरम्यान, फायनान्सशी संबंधित एका प्रकरणाच्या निमित्ताने भूषणने दिनेशच्या माध्यमातून निलेशला शिरसोली येथे बोलावले. प्रकरणावर चर्चा करत असताना वाद विकोपाला गेला आणि शिरसोली गावालगतच्या एका शेतात भूषण पाटील व दिनेश चौधरी यांनी निलेश कासार याचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात बांधून नेव्हरे धरणात फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. निलेश बेपत्ता असल्याने पोलिस व नातेवाईकांकडून शोधमोहीम सुरू होती. दरम्यान रामदेववाडी गावालगत निलेशची दुचाकी आढळून आली. यामुळे संशय बळावला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोबाईल कॉल डिटेल्स व तांत्रिक तपास सुरू केला. चौकशीत संशयित दिनेश व भूषण यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी खुनाची कबुली दिली. शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी नेव्हरे धरणातून निलेश कासार याचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर