
नागपूर,19 डिसेंबर (हिं.स.) । हनीट्रॅपद्वारे ज्येष्ठ नागरिकाकडून खंडणी उकळणाऱ्या टोळीला गुन्हेशाखा व घरफोडी विरोधी पथकाने अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सात पुरुषांसह चार महिलांना अटक करण्यात आली आहे.
नागपुरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला 5 सप्टेंबर ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले. खासगी क्षणांचे चित्रीकरण करून ते सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपींनी पीडिताकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात एकूण 1 लाख 78 हजार रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर थेट 2 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. अखेर तडजोडीनंतर 60 लाख रुपयांवर व्यवहार ठरवण्यात आला.
सहायक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा पथकाने 18 डिसेंबर रोजी एका हॉटेलमध्ये सापळा रचला. पोलिसांच्या सूचनेनुसार फिर्यादीने 60 लाखांऐवजी 3 लाख रुपये घेऊन आरोपींना हॉटेलमध्ये भेट दिली. अश्विन धनविजय, नितीन कांबळे व कुणाल पुरी यांनी पुन्हा संपूर्ण 60 लाख रुपयांची मागणी करताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना अटक केली. त्यानंतर उर्वरित आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अश्विन विनोद धनविजय , नितीन सुखदेव कांबळे, कुणाल प्रकाश पुरी, रितेश उर्फ पप्पू मनोहर दुरुगकर, आशिष मधुकर कावडे, अविनाश हेमराज साखरे, रविकांत कांबळे यांच्यासह 4 महिला आरोपींचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 1500 रुपये रोख रक्कम व विविध कंपन्यांचे मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 308 (2), 61(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी