
जळगाव, 19 डिसेंबर (हिं.स.) । चाळीसगाव रेल्वे स्थानक परिसरात गांजा पिणाऱ्या लोकांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत असतानाच गुरुवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांमध्ये जुन्या वादातून झालेल्या जोरदार भांडणाचा शेवट थेट गोळीबारात झाला असून, या घटनेत तिसऱ्याच एका तरुणाच्या पायाला गोळी लागून तो जखमी झाला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रेल्वे स्थानक परिसरातील एका झोपडीजवळ गुरुवारी दि. १८ रोजी रात्री ही थरारक घटना घडली. दीपक मरसाळे व चेतन गोल्हार हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, चेतन गोल्हारसोबत असलेला रोहित कोळी हे तिघे त्या ठिकाणी गांजा पित बसले होते. यावेळी दीपक व चेतन यांच्यात जुन्या वादातून शाब्दिक चकमक झाली आणि ती पाहता पाहता जोरदार भांडणात रूपांतरित झाली. या भांडणाच्या भरात दीपक मरसाळे याने त्याच्याकडील बेकायदेशीर पिस्तूल बाहेर काढून चेतन गोल्हार याच्यावर दोन राउंड गोळीबार केला.
या गोळीबारात एक गोळी चेतनऐवजी रोहित कोळी याच्या पायाला लागली, तर दुसरी गोळी निसटून गेली. मध्यरात्रीनंतर गांजाच्या नशेतून सावरल्यानंतर रोहित कोळी याला पायाला झालेल्या जखमेबाबत संशय आला. त्यानंतर त्याने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली, तेथे तपासणीदरम्यान गोळी लागल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, पोलीस निरीक्षक अमित मनेल यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी रोहित कोळी याचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, संशयित आरोपी दीपक मरसाळे याला अटक करण्यासाठी पोलीस पथके शोध घेत आहेत.दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात खुलेआम गांजाचे अड्डे सुरू असणे आणि अशा ठिकाणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा वावर वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हाभरात सातत्याने घडणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर