वेग ठरला काळ! मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक अपघातात चालकाचा मृत्यू
रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील अमृतांजन पुलाजवळ मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने थेट पुलाच्या कॉलमला जोरदार धडक दिल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ट्रकचा क्रमांक MH 12 LT 9777 असा
वेग ठरला काळ!  मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक अपघातात चालकाचा मृत्यू


रायगड, 19 डिसेंबर (हिं.स.)। मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील अमृतांजन पुलाजवळ मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने थेट पुलाच्या कॉलमला जोरदार धडक दिल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ट्रकचा क्रमांक MH 12 LT 9777 असा आहे. या अपघातामुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली.

अपघात इतका भीषण होता की ट्रकचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला. चालक केबिनमध्ये अडकून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताचा आवाज इतका प्रचंड होता की आजूबाजूच्या परिसरातील वाहनचालक थरकापून गेले. काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, आयआरबी पथक, तसेच आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. मृत चालकाचा मृतदेह मोठ्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आला. अपघातस्थळी पाहणी करताना पुलाच्या कॉलमला किरकोळ नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले.

प्राथमिक तपासात ट्रकचा वेग जास्त असणे, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा ब्रेक फेल होणे ही संभाव्य कारणे असू शकतात, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. मृत चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येत आहे.

या अपघातामुळे पुन्हा एकदा मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील वेगमर्यादा व जड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande