
नवी दिल्ली, २० डिसेंबर (हिं.स.). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आणि राज्यातील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन 'जंगलराज' असे केले. त्यांनी आरोप केला की, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालचा विकास थांबला आहे. आणि तृणमूल काँग्रेस फक्त भाजपला विरोध करण्यासाठी सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील ताहेरपूर येथील रॅलीला खराब हवामानामुळे वर्चुअली संबोधित केले. दाट धुक्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर ताहेरपूरमधील तात्पुरत्या हेलिपॅडवर उतरू शकले नाही, ज्यामुळे त्यांना कोलकाता येथे परत येऊन फोनद्वारे सभेला संबोधित करावे लागले. पंतप्रधानांनी याबद्दल नागरिकांची माफी मागितली आणि सांगितले की, हवामानामुळे ते त्यांना प्रत्यक्ष भेटू शकले नाहीत. पण त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत.पंतप्रधानांनी आज सकाळी ताहेरपूर स्टेशनजवळ झालेल्या रेल्वे अपघाताबद्दलही दुःख व्यक्त केले. खराब हवामानामुळे रॅलीच्या ठिकाणी जाताना काही भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. मृत कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांबद्दल त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींना लवकर बरे होण्याची शुभेच्छा दिल्या.
मोदींनी सांगितले की, केंद्र सरकारने पश्चिम बंगालमधील दुर्लक्षित असलेल्या भागात आधुनिक कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांनी सांगितले की, बाराजागुली ते कृष्णनगर या चार पदरी रस्त्यामुळे उत्तर २४ परगणा, नादिया आणि आसपासच्या भागांना मोठा फायदा होईल. बारासाट ते बाराजागुली या चार पदरी रस्त्याच्या प्रकल्पावरही काम सुरू झाले आहे, ज्यामुळे आर्थिक क्रियाकलाप आणि पर्यटनाला चालना मिळेल.नादियाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, ही ती भूमी आहे जिथे प्रेम, करुणा आणि भक्तीचे प्रतीक चैतन्य महाप्रभू प्रकट झाले. ते म्हणाले की, पश्चिम बंगालने देशाला स्वातंत्र्यलढ्यादरम्यान नवीन चेतना देणारे अमर गीत वंदे मातरम दिले. संपूर्ण देश वंदे मातरम स्वीकारल्यापासून १५० वर्षे साजरी करत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, आज देशाला जलद विकासाची इच्छा आहे आणि बिहारमध्ये एनडीएचा अलिकडेच झालेला प्रचंड विजय हे त्याचेच एक उदाहरण आहे. मोदी म्हणाले की, बिहारमध्ये भाजप आणि एनडीएच्या प्रचंड विजयानंतर त्यांनी म्हटले होते की, गंगा बिहारमधून वाहते आणि बंगालमध्ये पोहोचते आणि बिहारने बंगालमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. ते म्हणाले की, बिहारने एकमताने जंगलराज नाकारला आहे आणि आता पश्चिम बंगाललाही महाजंगल राज पासून मुक्त करावे लागेल.पंतप्रधान मोदी म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये निधी, योजना किंवा केंद्र सरकारच्या हेतूंची कमतरता नाहीय पण येथील सरकार कपात आणि कमिशन करण्यात व्यस्त आहे. हजारो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प अजूनही रखडलेले आहेत. ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसने हजार वेळा मोदींना विरोध केला आणि भाजपला सर्व शक्तीनिशी विरोध केला तरी राज्याचा विकास थांबवणे हे समजण्यापलीकडे आहे.
घुसखोरीच्या मुद्द्यावरही पंतप्रधानांनी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, जेव्हा भाजप घुसखोरांविरुद्ध आवाज उठवते तेव्हा तृणमूल काँग्रेसचे नेते अस्वस्थ होतात. सोशल मीडियावरील मोदी गो बॅक पोस्टर्सचा संदर्भ देत ते म्हणाले की, पश्चिम बंगालमधील प्रत्येक रस्त्यावर आणि खांबावर घुसखोर परत जा असे लिहिले गेले तर बरे होईल.पंतप्रधानांनी पश्चिम बंगालच्या जनतेला राज्यात जलद विकासासाठी भाजपला संधी देण्याचे आणि डबल इंजिन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भाजप सरकार बंगालचे वैभव पुनर्संचयित करण्यासाठी आणि जनतेची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी काम करेल.------------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे