
अमरावती, 22 डिसेंबर (हिं.स.)शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनासह राजापेठ येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीदरम्यान झालेल्या पोलीस कार्यवाही संदर्भातील प्रकरणात आमदार रवि राणा हे आपल्या कार्यकर्त्यांसह न्यायालयात हजर राहिले.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. रवि राणा यांनी यापूर्वी आंदोलन छेडले होते. त्याचप्रमाणे राजापेठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, ही नागरिक व शिवप्रेमींची मागणी असून, त्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले होते. मात्र या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून कार्यवाही करण्यात आली होती. या कार्यवाहीविरोधात न्यायालयीन लढा सुरू असून, त्याच अनुषंगाने आज सुनावणी पार पडली.
या प्रकरणात आ. रवि राणा यांच्यावतीने अॅड. दीप मिश्रा, अॅड. प्रशांत देशपांडे, चंदू गुळसुंदरे तसेच अॅड. रोहिणी तोंडरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. आंदोलन लोकशाही मार्गाने व पूर्णतः शांततेत करण्यात आले होते. शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जनतेच्या भावना लक्षात घेता पोलिसांनी केलेली कार्यवाही अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद वकिलांकडून करण्यात आला.न्यायालयात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला पाठिंबा देत न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयाने निश्चित केली असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी