सौर कृषी पंपाच्या तक्रारींसाठी महावितरणचा ‘डिजिटल’ हातभार
शेतकऱ्यांना आता घरबसल्या तक्रार नोंदणी व निवारणाची सुविधा नागपूर, 22 डिसेंबर (हिं.स.) : शेतात दिवसा सिंचन करण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेमुळे महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. या योजनेचा लाभ घेत
महावितरण लोगो


शेतकऱ्यांना आता घरबसल्या तक्रार नोंदणी व निवारणाची सुविधा

नागपूर, 22 डिसेंबर (हिं.स.) : शेतात दिवसा सिंचन करण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेमुळे महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात मोठी क्रांती घडली आहे. या योजनेचा लाभ घेताना किंवा सौर पंपाच्या देखभालीदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज उरलेली नाही.

सौर कृषी पंप बसविण्यात होणारा विलंब, तसेच कार्यरत पंपातील तांत्रिक बिघाड यासारख्या समस्यांसाठी शेतकरी आता थेट ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. यासाठी महावितरणने स्वतंत्र ‘तक्रार निवारण पोर्टल’ विकसित केले असून, नोंदविलेल्या तक्रारींच्या स्थितीचा मागोवा (Status Tracking) घेण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

तक्रार कशी नोंदवावी..?

सौर कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवण्यासाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in वर भेट द्यावी.

होमपेजवरील डाव्या बाजूस असलेल्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ या टॅबवर क्लिक करावे.

त्यानंतर ‘तक्रार निवारण’ या विभागात जाऊन ‘Register Complaint’ (तक्रार नोंदवा) या पर्यायावर क्लिक करावे.

तक्रार नोंदवताना लाभार्थी क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा जिल्हा, तालुका, गाव व लाभार्थ्याचे नाव भरून आपली समस्या सविस्तर नमूद करता येते.

तसेच, तक्रारीच्या स्थितीचा आढावाही याच पोर्टलवर पाहता येतो.

नागपूर- वर्धा जिल्ह्यात सौर पंपांचा मोठा विस्तार

नागपूर व वर्धा जिल्ह्यांतील हजारो शेतकरी सौर ऊर्जेच्या माध्यमातून यशस्वीपणे शेती करत आहेत. ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’, ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’ आणि ‘अटल सौर कृषी पंप योजना’ अंतर्गत नागपूर परिमंडळात एकूण 7,094 सौर कृषी पंप कार्यान्वित झाले आहेत.

यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 4,880 तर वर्धा जिल्ह्यातील 2,214 सौर पंपांचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात या दोन्ही जिल्ह्यांतून प्राप्त झालेल्या सर्व तांत्रिक तक्रारींचे महावितरणने यशस्वी निवारण केले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना

‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना केवळ वीज बिलाची बचत करत नाही, तर रात्रीच्या वेळी साप-विंचवाच्या भीतीतून मुक्तता देत दिवसा सुरक्षित सिंचनाची हमी देते.

मोफत किंवा सवलतीच्या दरात सौर संच, दिवसा हक्काची वीज, कमी देखभाल खर्च, 10 ते 25 वर्षांची गॅरंटी आणि पर्यावरणपूरक शेती ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत असून, राज्याला दुसऱ्या हरित क्रांतीकडे घेऊन जाणारी ठरत आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande