
अमरावती, 23 डिसेंबर (हिं.स.)
विदर्भाची पुरातन राजधानी, रुक्मिणी मातेचे माहेरघर व भगवान श्रीकृष्णाचे सासर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील अंबिका पीठ व रुक्मिणी पीठाला शासनाकडून अधिकृतपणे ‘क’ तीर्थक्षेत्र दर्जा मंजूर झाल्याने संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आनंदाची लाट उसळली आहे. या ऐतिहासिक मान्यतेमुळे कौंडण्यपूरच्या धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभवात मोलाची भर पडली आहे.
या महत्त्वपूर्ण दर्जा प्राप्तीसाठी भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश येत शासनाकडून ‘क’ दर्जाची मान्यता मिळाल्याने भाविकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण आहे.
या आनंददायी निर्णयानिमित्त भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अमित बाभुळकर यांच्यासह संतोष बठिये, विनायक कडू, दिलीप मेहकरे, प्रशांत कडू, अर्पित दुबे, प्रफुल कडू, पांडुरंग चराडे, आशिष दुबे, विनोद महल्ले आदी पदाधिकाऱ्यांनी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे जगद्गुरु श्री संत राजेश्वर माऊली यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाल, श्रीफळ व शासनाकडून प्राप्त झालेल्या ‘क’ दर्जाच्या अधिकृत पत्राची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचे विशेष आभार मानले. तसेच कंबर रुक्मिणी महोत्सव समितीचे अध्यक्ष या नात्यानेही हा निर्णय भाविकांसाठी ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले.जगद्गुरु श्री संत राजेश्वर माऊली यांनी भाजप पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत सांगितले की, ‘क’ तीर्थक्षेत्र दर्जा म्हणजे अंबिका पीठ व रुक्मिणी पीठाच्या दीर्घकालीन सेवाकार्याला व धार्मिक परंपरेला मिळालेली मान्यता आहे. या दर्जामुळे भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा, धार्मिक उपक्रम, सामाजिक व आध्यात्मिक कार्य भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी