
नवी दिल्ली, 25 डिसेंबर (हिं.स.)भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर दुखापतीमुळे अनेक महिने मैदानाबाहेर आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस, अय्यरला ऑस्ट्रेलियामध्ये बरगडीला दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते. त्यावेळी अय्यरच्या दुखापतीमुळे बरीच चर्चा झाली. पण आता, त्याच्या दुखापतीबद्दल काही चांगली बातमी समोर आली आहे. अय्यर त्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे. तो नेटमध्ये घाम गाळताना दिसला. काही दिवसांपूर्वी, अय्यरने आयपीएलच्या मिनी-लिलावातही भाग घेतला होता. तो नेटमध्ये फलंदाजी आणि सराव करतानाही दिसला होता. यामुळे अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी पुनरागमन करू शकेल का याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणारा न्यूझीलंड संघ टी-२० सामन्यांसह एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असल्याची माहिती आहे. भारतीय संघ निवडकर्त्यांनी टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे,. पण अद्याप एकदिवसीय संघ जाहीर झालेला नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दोन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केले आहेत.
श्रेयसने २४ डिसेंबर रोजी मुंबईत फलंदाजीचा सराव पुन्हा सुरू केला. अय्यरने सुमारे एक तास कोणत्याही अडचणीशिवाय फलंदाजी केली. तो आता बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) येथे रवाना झाला आहे, त्यानंतर त्याच्या परतण्याची वेळ निश्चित केली जाईल.
ऑक्टोबरच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत दुखापत झालेल्या श्रेयस अय्यरला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले होते. तो सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळत नाही. पण त्याने आता फिटनेस सत्रे पुन्हा सुरू केली आहेत. दुखापतीनंतर केलेल्या सर्व स्कॅनमध्ये सकारात्मक निकाल दिसून आले आहेत. ज्यामुळे अय्यरच्या लवकरच पुनरागमनाची आशा निर्माण झाली आहे.
श्रेयस आता वेदनामुक्त आहे. सध्या त्याला कोणताही त्रास नाही आणि मुंबईत त्याने कोणत्याही समस्येशिवाय फलंदाजी केली. भारताचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध आहे आणि सध्या तो अनिश्चित असला तरी, विजय हजारे ट्रॉफीच्या शेवटच्या टप्प्यात तो परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे