सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांची सन 2025 मधील सर्वसमावेशक, प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी
लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)। डिजिटल युगात इंटरनेट, सोशल मीडिया,ऑनलाईन व्यवहार व मोबाईल तंत्रज्ञानाचा वाढता वापर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या आधुनिक सुविधांबरोबरच सायबर गुन्ह्यांचे स्वरूपही अधिक गुंतागुंतीचे
सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांची सन 2025 मधील सर्वसमावेशक, प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी.


लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।

डिजिटल युगात इंटरनेट, सोशल मीडिया,ऑनलाईन व्यवहार व मोबाईल तंत्रज्ञानाचा वाढता वापर नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या आधुनिक सुविधांबरोबरच सायबर गुन्ह्यांचे स्वरूपही अधिक गुंतागुंतीचे व धोकादायक बनत चालले आहे. ऑनलाईन फसवणूक, डिजिटल अरेस्ट, सोशल मिडिया हॅकिंग, डीप फेक व्हिडिओ, आर्थिक सायबर गुन्हे, बनावट लिंक व ॲप्सद्वारे होणारी फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असताना, नागरिकांच्या संरक्षणासाठी सायबर पोलीस स्टेशन,लातूर यांनी सन 2025 मध्ये अत्यंत प्रभावी, परिणामकारक व कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे.

सायबर जनजागृती कार्यक्रम

प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपायसायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केवळ गुन्हे नोंदवणे व तपास करणे पुरेसे नसून नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांनी सन 2025 मध्ये महिला, बालक, तरुण, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले. दयानंद महाविद्यालय, NCC कॅम्प, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (ITI), CRPF कॅम्प, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज, लातूर तसेच इतर विविध सार्वजनिक ठिकाणी सायबर जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, त्यांची प्राथमिक ओळख, फसवणुकीचे नवे तंत्र, तसेच स्वतःचे डिजिटल संरक्षण कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930, 1945, 14407 तसेच सायबर क्राईम पोर्टल www.cybercrime.gov.in याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

सायबर जनजागृती मास

ऑक्टोबर 2025 मध्ये सायबर जनजागृती मासाच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 18 जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमांद्वारे नागरिकांना ऑनलाईन फसवणूक कशी ओळखावी, सोशल मिडियाचा सुरक्षित वापर कसा करावा, OTP व PIN गोपनीय ठेवण्याचे महत्त्व, तसेच संशयास्पद लिंकपासून कसे दूर राहावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

हरविलेले मोबाईल रिकव्हरी – CEIR पोर्टलद्वारे मोठे यश.

सायबर पोलीस स्टेशन, लातूर मार्फत सन 2025 मध्ये CEIR पोर्टलवर मोबाईल गहाळ झाल्याच्या एकूण 1313 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी तांत्रिक तपास करून 317 हरविलेले मोबाईल फोन यशस्वीपणे शोधून काढून संबंधित तक्रारदारांना परत देण्यात आले. ही कामगिरी नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे.

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात तांत्रिक सहाय्य.

लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या 121 गंभीर गुन्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांनी अत्याधुनिक तांत्रिक सहाय्य प्रदान केले. मोबाईल डेटा, कॉल डिटेल्स, डिजिटल पुरावे, सोशल मीडिया विश्लेषण आदींच्या मदतीने हे गुन्हे उघडकीस आणण्यात मोठे यश मिळाले.

सायबर फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्यात उल्लेखनीय यश.

सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देणे हे सायबर पोलीस स्टेशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

लातूर येथील एका सेवानिवृत्त नागरिकाची डिजिटल अरेस्ट या प्रकारातून ₹71,00,000/- इतकी फसवणूक करण्यात आली होती. गुन्हा नोंदवून तात्काळ तपास सुरू करण्यात आला. संबंधित बँकांशी पत्रव्यवहार, तांत्रिक तपास व मा. न्यायालयाचे आदेश प्राप्त करून ₹40,63,870.18/- इतकी रक्कम यशस्वीपणे फिर्यादीस परत मिळवून देण्यात आली. या प्रकरणात एक आरोपीस अटक करण्यात आली आहे. तसेच सन 2025 मध्ये सायबर फसवणुकीतील पीडित नागरिकांना एकूण ₹55,88,420.18/- इतकी रक्कम परत मिळवून देण्यात सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांना यश आले आहे.

ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी व सोशल मीडिया मॉनिटरिंग.

सायबर पोलीस स्टेशन, लातूर येथे अत्याधुनिक सायबर टूल्सचा वापर करून गुन्ह्यांचा तपास करण्यात येतो. सोशल मीडिया मॉनिटरिंगद्वारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्ती व संघटनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या समाजमाध्यमांद्वारे नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत सतत संदेश दिले जात आहेत.

तसेच सायबर पोलीस स्टेशन मार्फत लातूर जिल्ह्यातील 6000 बँक खातेधारकांचे खाते कोणत्या पोलीस ठाण्याद्वारे गोठविण्यात आले आहे, याबाबत सायबर पोलीस स्टेशनने योग्य मार्गदर्शन केले. प्राप्त झालेल्या अनेक तक्रारींमध्ये तांत्रिक तपास पूर्ण करून आरोपींना अटक करण्यात आली असून, नागरिकांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आले आहेत.

सन 2023 व 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांनी अधिक प्रभावी, तत्पर व तांत्रिकदृष्ट्या सक्षम कार्यवाही केली आहे. ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया गैरवापर, आर्थिक सायबर गुन्हे व बनावट लिंकद्वारे होणाऱ्या फसवणुकीवर वेळेत कारवाई करण्यात आली आहे.

सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांची ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक श्रीमती वाकडकर आणि त्यांचे कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाली आहे. भविष्यातही सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील.

सायबर पोलीस स्टेशन, लातूर यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, डिजिटल व्यवहार करताना सतर्क रहा, संशयास्पद लिंक व मेसेजपासून दूर राहा, कोणालाही OTP, PIN किंवा पासवर्ड देऊ नका. कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना सायबर सुरक्षेबाबत माहिती द्या. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित 1930 / 1945 या हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande