
रायपूर, 3 डिसेंबर (हिं.स.) - छत्तीसगडमधील बीजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमाभागात झालेल्या चकमकीत सात नक्षलींना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. मात्र, यात दोन जवानांनाही आपले प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान चकमक सुरूच असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बिजापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी घातपात घडविण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची गोपनीय माहिती यंत्रणेला मिळाली होती. त्यावरून डीआरजी, एसटीएफ (विशेष कार्य दल) आणि कोब्रा सुरक्षा दलाचे विशिष्ट कमांडो यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून परिसरात शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी दबा धरून असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. यात मोनू वडाडी आणि आरक्षक दुकारू गोंडे या डीआरजी बीजापूरच्या दोन जवानांना वीरगती प्राप्त झाली. या व्यतिरिक्त जवान सोमदेव यादव हे जखमी झाले असून, त्यांना प्रथमोपचारानंतर पुढील उपचारांसाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोध घेतला असता सात नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. दरम्यान घटनास्थळावरून ‘एसएलआर’ आणि ३०३ बंदुकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. माओवादी कमांडर पापा राव यांच्या हद्दीतील गंगलोर परिसरात ही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी मोठ्या संख्येने माओवाद्यांना वेढले आहे.
बस्तर रेंजमध्ये नक्षलविरोधी कारवाया सध्या वेगाने सुरू आहेत. केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद निर्मूलनाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात संयुक्त कारवायांची तीव्रता वाढवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी