
- रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला होणार निवृत्त
मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.) - राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येत्या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने सात अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती, त्यात दाते यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत होते. अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. दातेंचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत असेल. दाते यांचा जन्म 14 डिसेंबर 1966 रोजीचा आहे. त्यांची नियुक्ती वाढदिवसाची भेट मानली जात आहे.
सदानंद दाते 1990 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलीस, एसपी नवी मुंबई आदी पदांवर काम केले आहे. सध्या ते एनआयएचे महासंचालक असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ‘ब्लॅक कॅट’ कमांडोंनी विविध ऑपरेशन्स यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दाते तेव्हा मुंबई क्राईम ब्रांचमध्ये कार्यरत होते. दोन दहशतवादी मुंबईच्या कामा रुग्णालयात घुसले, तेव्हा दाते यांनी काही पोलिसांसह त्यांचा सामना केला. त्यांच्या सतर्कतेमुळेच कामा रुग्णालयातून ओलिसांना सुरक्षितपणे बाहेर जाता आले. त्यावेळी दाते यांना दहशतवाद्यांच्या गोळ्या लागल्या होत्या. अजमल कसाबला फाशी देण्यासाठी आर्थर रोड तुरुंगातून पुण्यातील येरवडा तुरुंगात घेऊन जाण्याची महत्त्वाची जबाबदारी देखील त्यांनी यशस्वी पूर्ण केली आहे.
पोलिस दलात कर्तव्यकठोर अशी सदानंद दाते यांची प्रतिमा आहे. २०२०मध्ये स्थापन झालेल्या मीरा - भाईंदर पोलिस आयुक्तालयाचे ते पहिले पोलिस आयुक्त होते, तर मुंबईतही त्यांनी कायदा व सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्त तसेच गुन्हे शाखेचे सह-आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी पीएच. डी. संपादित केली, तसेच कॉस्ट अँड मॅनमेजमेंटचे शिक्षणही पूर्ण केले आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील त्यांची कामगिरी गाजली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी