
जळगाव, 30 डिसेंबर, (हिं.स.) सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील प्रगतशील शेतकरी व भुसार व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांची एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खंडणीची रक्कम वेळेत न मिळाल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी गव्हाणे यांना बेदम मारहाण करून त्यांचा मृतदेह चाळीसगाव घाट परिसरात फेकून दिला. या खळबळजनक प्रकरणी अजिंठा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
उंडणगाव येथून मक्याचे पैसे घेऊन दुचाकीने बोदवडकडे परतत असताना उंडणगाव–बोदवड रस्त्यावर आरोपींनी तुकाराम गव्हाणे यांना अडवले. सुरुवातीला त्यांच्या जवळील सुमारे एक लाख रुपयांची रोकड लुटल्यानंतर अधिक पैशांच्या हव्यासापोटी आरोपींनी त्यांचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर गव्हाणे यांच्या मुलाला फोन करून तब्बल एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. गव्हाणे कुटुंबीयांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी वारंवार खंडणी स्वीकारण्याचे ठिकाण बदलत असल्याने तपासात अडथळे निर्माण होत होते. मात्र सपोनि. अमोल ढाकणे, फौजदार धम्मदीप काकडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. रात्री सुमारे ९ वाजता आरोपींनी ‘पैसे नकोत’ असे सांगत फोन बंद केला. संशय अधिक बळावल्याने पोलिसांनी तत्काळ समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर सापळा रचला. यावेळी कारमधून चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सचिन बनकर (२५), वैभव रानगोते (२३), अजिनाथ सपकाळ (२२) आणि विशाल खरात (२३) यांचा समावेश आहे. तसेच पोलिसांच्या हालचालींची माहिती इतर आरोपींना पुरवणारा दीपक जाधव (२५) यालाही अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, शेतकरी व व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अजिंठा पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर