
मुंबई, 31 डिसेंबर (हिं.स.) - राज्यातील नागरिकांच्या सक्रिय सहभागातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासह दूरदर्शी नियोजनाच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र’ साकारण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्र आपली महत्त्वपूर्ण भूमिका यशस्वीपणे बजावेल, असा दृढ विश्वास व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्ष 2026च्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या मार्गावर अधिक वेगाने घेऊन जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, महाराष्ट्रवासियांच्या एकजूट आणि निर्धाराच्या बळावर राज्याने आतापर्यंत प्रत्येक आव्हानावर यशस्वीपणे मात केली आहे. ही एकजूट कायम ठेवत विकासाची वाटचाल अधिक भक्कम करण्याचा शासनाचा ठाम संकल्प आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत 2047’ या संकल्पपूर्तीत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्याअनुषंगाने राज्याची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचं ध्येय निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा एकमेव अजेंडा असून, त्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणी, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच शहरी व ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह प्रभावी नियोजनाच्या माध्यमातून ‘विकसित महाराष्ट्र’ साकारण्यासाठी ठोस आणि निर्णायक पावले उचलली जात आहेत.
कृषी, उद्योग, शिक्षण, सहकार, कला-संस्कृती तसेच सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्राचे अग्रस्थान कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नववर्षाचे स्वागत उत्साहात, मात्र संयम आणि आरोग्यभान राखत करण्याचं आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी