नाशिक, 18 फेब्रुवारी (हिं.स.) : क्रेडिट कार्ड बंद करतो, असे सांगून ते कार्ड ताब्यात घेऊन त्याचा वापर करून चार जणांनी एका इस्टेट एजंटच्या खात्यावरील दोन लाखांची रक्कम परस्पर काढून घेत फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अविनाश तुकाराम येवले (रा. कामटवाडा) हे रिअल इस्टेट एजंट आहेत. आरोपी कमलेश मनसुब खटकाळे याने येवले यांचे आर. बी. एल. बजाज फायनान्सचे क्रेडिट कार्ड बंद करतो, असे सांगून स्वतःकडे घेऊन त्यांचा मोबाईल स्वतःकडे घेतला; मात्र क्रेडिट कार्ड बंद न करता त्याद्वारे एकूण २ लाख ३३६ रुपये क्रेडिट कार्डाचा सिद्धिविनायक पेट्रोल पंप येथे वापर करून ही रक्कम त्याची आई कुसुम मनसुब खटकाळे व उमेश
मनसुब खटकाळे यांच्या खात्यावर ट्रान्स्फर करून फिर्यादी येवले यांची फसवणूक करून त्याचा अपहार केला. याबाबत आर. बी. एल. बजाज फायनान्सचे मॅनेजर विकास जगताप यांना ऑफिसमध्ये जाऊन या प्रकाराबाबत चौकशी केली. त्याबाबत येवले यांना काही एक माहिती न देता उलट त्यांना दमदाटी केली. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत कॉलेज रोडवरील बजाज फायनान्सच्या कार्यालयात घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित कमलेश खटकाळे, विकास जगताप, कुसुम खटकाळे, उमेश खटकाळे यांच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI