जळगाव, 18 फेब्रुवारी (हिं.स.)यावल वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारावर मोठी कारवाई करत सलई डिंकची चोरटी वाहतूक उघडकीस आणली आहे. १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास मालोद परिसरात ही कारवाई करण्यात आली असून मोटरसायकलसह मोठ्या प्रमाणात सलई डिंक जप्त करण्यात आला आहे. यावल वनविभागाच्या गस्ती पथकाला मालोद ते आडगाव रस्त्याच्या बाजूला काही संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पथकाने सापळा रचला. सोमवारी पहाटेच्या सुमारास एक मोटरसायकल येताना दिसली, ज्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, मोटरसायकलवरील व्यक्तींनी मोटरसायकल आणि सोबत असलेला मुद्देमाल तिथेच टाकून पळ काढला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये हिरो एचएफ डिलक्स कंपनीची नंबर नसलेली मोटरसायकल, ज्याची किंमत २९ हजार ५०० रुपये आहे, आणि ८४ किलो सलई डिंक, ज्याची किंमत ९ हजार २४० रुपये आहे, असा एकूण ३८ हजार ७४० रुपयांचा माल आहे. हा सर्व माल यावल येथील मुख्य विक्री केंद्रात जमा करण्यात आला आहे. या प्रकरणी वनविभागाने गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई वनसंरक्षक (प्रा. ), धुळे वनवृत्त निनु सोमराज, उपवन संरक्षक यावल वन विभाग जमीर शेख, विभागीय वन अधिकारी धुळे, राजेंद्र सदगिर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, वनक्षेत्रपाल गस्ती पथक स्वप्नील फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईमध्ये वनपाल आर. एम. जाधव, वनपाल आर. बी. थोरात, पोलीस कॉन्स्टेबल सचिन तडवी, वाहन चालक वाय. डी. तेली आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर