मुंबई , 18 फेब्रुवारी (हिं.स.)।चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या हंगामाला उद्यापासून(१९ फेब्रुवारी) सुरुवात होत आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी सहभागी आठ संघाच्या नव्या जर्सीची झलक पाहायला मिळत आहे.यामध्ये भारतीय संघाच्या नव्या जर्सीची झलक समोर आली असून नव्या जर्सीवर पाकिस्तानचे नावही छापल्याचे दिसून येते.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार, आयसीसीच्या स्पर्धेत जो यजमान संघ असेल त्याचे नाव सहभागी संघाच्या जर्सीवर छापले जाते. याच नियमानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) टीम इंडियाच्या नव्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापायला राजी झाल्याचे दिसते. बीसीसीआयने जे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत भारतीय संघाच्या जर्सीवरील उजव्या बाजूला ठळक अक्षरात चॅम्पियन्स असं लिहिलं आहे. त्याच्या खाली ट्रॉफी २०२५ पाकिस्तान असं छोट्या अक्षरात छापल्याचे दिसून येते. जर्सीवर डाव्या बाजूला बीसीसआयचा लोगो आणि मधोमध 'इंडिया' असं भगव्या रंगात लिहिले आहे.
ज्यावेळी पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची टीम इंडियाची जर्सी लॉन्च करण्यात आली होती त्यावेळी त्यावर पाकिस्तान नावाचा उल्लेख करण्यात आला नव्हता. या मुद्यावरून पाकिस्तानमधून काही तिखट प्रतिक्रियाही उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता आता बीसीसीआयने भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव छापून यजमानांना त्यांचा मान देत तंटामुक्त सीनची झलक दाखवून दिलीये. हायब्रिड मॉडेलनुसार, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. २० फेब्रुवारीला भारत-बांगलादेश अशी रंगत पाहायला मिळेल. त्यानंतर २३ फेब्रुवारीला भारत-पाक महामुकाबला आणि त्यानंतर २ मार्चला भारतीय संघ साखळी फेरीतील अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode