मुंबई, 4 फेब्रुवारी (हिं.स.) 'एमएसआरडीसी'च्या अंतर्गत राज्यात द्रुतगती मार्गाचे विविध प्रकल्प कार्यान्वित असून काही प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार असल्याचा असा विश्वास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निर्मल भवन येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) च्या कामकाजाचा व १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल आदी अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी द्रुतगती मार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांना द्रुतगती महामार्गांनी जोडल्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.
नागपूर ते गोवा ८०२ किमी शक्तिपीठ महामार्ग हा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग, नाशिक रिंग रोड, कोकण एक्सप्रेस, शेगाव-सिंदखेडराजा भक्ती मार्ग आदी प्रकल्पांमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल, आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग, राजीव गांधी बांद्रा-वरळी सी-लिंक, ठाणे खाडी पूल क्र.३ या पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच प्रगतीपथावरील समृद्धी महामार्गाचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा, यशवंतराव चव्हाण मुबंई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक, स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, जीएसटी भवन तसेच समृद्धी महामार्गावर वाहतूक नियंत्रण सुलभ होण्यासाठी प्रस्तावित आयटीएमएस यंत्रणेचाही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी
आढावा घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर