मुंबई, 5 फेब्रुवारी (हिं.स.)।मराठीतील पहिलावहिला ओटीटी म्हणून नावारूपास आलेल्या प्लॅनेट मराठी पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. यापूर्वीही प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांच्याविरोधात अनेक प्रकरणे दाखल झाली आहेत. ज्यामध्ये दुबईमधील गुंतवणूकदारांचा समावेश आहे. यांच्यासह मीडिया प्रोफेशनल आयुष शाह आणि 'ताराराणी' चित्रपटाच्या निर्मात्या यांनीही त्यांच्यावर केसेस केल्या आहेत. सुमारे ३० कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अनेक कंपन्यांनी प्लॅनेट मराठीला एनसीएलटीमध्ये लिक्विडेशनसाठी नेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सोबतच आता माजी सहसंस्थापक सौम्या विळेकर यांनी देखील प्लॅनेट मराठीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक मृत्यू झाला. त्या वैयक्तिक दुःखात असताना प्लॅनेट मराठीकडून होणारा नाहक त्रासामुळे त्यांनी प्लॅनेट मराठीविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
प्लॅनेट मराठीच्या सहसंस्थापक असलेल्या सौम्या विळेकर यांनी जानेवारी २०२४ मध्ये प्लॅनेट मराठी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबत मीडियामध्ये अधिकृत घोषणाही केली होती. २०२३ मध्येच कंपनीच्या व्यवहारांमध्ये मोठे मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर कंपनीत असलेल्या त्यांच्या मोठ्या हिस्सेदारीबाबत देखील त्यांनी उघड केले होते. यापूर्वीही प्लॅनेट मराठी व अक्षय बर्दापूरकर यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आणि लेख प्रकाशित झाले आहेत. यापैकी काही प्रकरणे स्वत: सौम्या विळेकर यांनी कोर्टात दाखल केली आहेत, त्यात ७ करोडचे चेक्स बाऊन्स, फसवणूक, अनेक पुरवठादारांना खोटी माहिती देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याच्या फौजदारी तक्रारी दाखल झाल्सा आहेत.
सौम्या विळेकर या प्रकाराबद्दल म्हणतात, “मी २०१९ पासून कंपनीत अधिकृतपणे सामील झाले होते. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आणि नैतिक पद्धतीने चालू होते, तेव्हा मी कंपनीच्या यशासाठी काम करत होते. पण काही व्यवहारांमध्ये मला जबरदस्तीने सामील करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मला कंपनी सोडावी लागली. आजपर्यंत शेअर्सच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि माझ्या एक्झिटशी संबंधित अनुपालन पूर्ण झालेले नाही. ज्यामुळे माझ्या बाजूने कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. कंपनीत कार्यरत असताना माझ्या परिचयांकडून, कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवाराकडून कंपनीसाठी गुंतवणूक केली होती. पण त्या काळात घेतलेले काही चुकीचे निर्णय आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
सौम्या विळेकर पुढे म्हणातात, “मी या सगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेकदा चर्चा करण्यासही विचारणा केली होती. परंतु समोरून मला सकारात्मक प्रतिसाद न आल्याने आणि खोटी आश्वासने आल्याने कायदेशीर प्रक्रिया करण्याशिवाय माझ्यासमोर कोणता पर्यायच उरला नाही. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, ती सगळ्या गोष्टींची नीट तपासणी करून या परिस्थितीचे समाधान करेल, ज्यामुळे मला आणि इतरांनाही खूप त्रास झाला आहे. मी कंपनीचा ताबा देऊन १ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे म्हणून, मी न्यायालयाला विनंती करते, की मला कंपनीतून सुरळीत एक्झिट द्यावी.”
‘चंद्रमुखी,’ ‘गोष्ट एका पैठणीची,’ ‘तमाशा लाईव्ह’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी या प्लॅटफॉर्मला एक वेगळी ओळख दिली होती. प्लॅनेट मराठीने दर्जेदार कंटेंट आणि नवनवीन प्रयोगांमुळे आपले स्थान निर्माण केले होते आणि त्याने अनेक लोकांच्या मनात ठसा उमठवला होता. मात्र, सध्या त्यांच्या प्रतिष्ठेला तडा गेला असून प्लॅनेट मराठी वादांच्या भोवऱ्यात
अडकले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर