चंद्रपूर, 11 मार्च, (हिं.स.)। रविवारी झालेल्या भारत- न्यूझीलंड अंतिम सामन्यात स्थानिक हॉटेल व्यंकटेश येथे क्रिकेट सट्टा घेणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करीत तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत 'बेटिंग' करिता वापरात येणारे बँक खात्यातील सुमारे ६० लक्ष रुपयांपर्यंतची रक्कम पोलिसांनी गोठवली आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील स्थानिक कस्तुरबा रोडवरील हॉटेल व्यंकटेश या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. त्यात चंद्रपुरातील पारस उखाडे, अविनाश हांडे व राकेश कोंडावार हे हॉटेलच्या एका खोलीत भारत-न्यूझीलंड क्रिकेट सामन्यावर 'ऑनलाईन बेटिंग' आयडी पुरवणाऱ्या 'साइटवर बेटिंग' करीत असताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पाच मोबाईल, २६ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम, टीव्ही व इतर साहित्य असा एकुण एक लाख ७६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपींविरोधात पोलीस स्टेशन शहर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात इसम हे यापूर्वी देखील 'ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचे' गुन्ह्यातील आरोपी असून ते 'ऑनलाईन क्रिकेट बेटिंग' करता विविध लोकांना आयडी पासवर्ड देत असून 'बेटिंगच्या पैशाची देवाण-घेवाणकामी एकूण ३८ वेगवेगळी बँक खाती वापरत असल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत सुमारे ६० लक्ष रुपयापर्यंतची रक्कम गोठवण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव