अमरावती, 28 मार्च (हिं.स.)।
भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या एका वृद्धेचा काठीने हल्ला चढवून खून करण्यात आला. नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील यास्मिननगर येथे घडली. या घटनेनंतर नागरिकांनी मारेकऱ्याला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
अख्तर बी शेख नुरूल्ला (६०, रा. यास्मिननगर) असे मृत वृद्धेचे नाव आहे. तर, शेख अख्तर शेख अयुब (२५, रा. यास्मिननगर) असे मारेकऱ्याचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शेख अख्तर व अख्तर बी शेख नुरूल्ला हे शेजारी राहतात. शेख अख्तरने त्याच्या आईला ईदनिमित्त कपडे घेण्यासाठी पैसे मागितले. त्यावर तू कुठलाही कामधंदा करत नाहीस, मी तुला कुठून पैसे देऊ, तुझे वडील आल्यानंतर त्यांना पैसे माग, असे त्या शेख अख्तरला म्हणाल्या. त्यामुळे शेख अख्तरने आई सुरैया यांना काठीने मारहाण सुरू केली. त्यावेळी अख्तरच्या शेजारी अख्तर बी शेख नुरूल्ला या दुकानात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी त्यांना शेख अख्तर हा त्याच्या आईला मारहाण करताना दिसला.
त्यामुळे त्यांनी त्याला हटकले. त्यांना मारू नकोस, अशी मध्यस्थीची भूमिका घेतली. मात्र, कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या शेख अख्तरने वृद्ध अख्तर बी शेख नुरुल्ला यांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. त्यामुळे त्या जागीच कोसळून गतप्राण झाल्या. या वेळी नागरिकांनी शेख अख्तरला पकडून चांगलाच चोप दिला. त्यानंतर घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी शेख अख्तरला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी शेख अख्तरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केल्याची माहिती नागपुरी गेटचे ठाणेदार हनुमंत उरलागोंडावर यांनी दिली.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी