माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन
नागपूर, 30 मार्च (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या वटवृक्षाला 100 वर्षे पूर्ण झाली आहे. आदर्श आणि सिद्धांतावर संघाचा वटवृक्ष टिकल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. नागपुरातील माधव नेत्रालयाच्या हिंगणा परिसरातील प्रीमियम सेंटर इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी अवधेशानंद गिरी आणि स्वामी गोविंद देव गिरी महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान म्हणाले की, कोणत्याही देशाचे अस्तित्व हे त्या देशातील पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या त्याच्या संस्कृतीच्या विस्तारावर अवलंबून असते. आपल्या देशावर एवढे परकीय हल्ले झाले, आपली संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. तरी भारतीय संस्कृतीची चेतना मिटली नाही. कारण ही चेतना जागृत ठेवणारे अनेक आंदोलन भारतात होत राहिले आहे. भक्ती आंदोलन त्याचेच एक उदाहरण आहे. आमच्या संतानी समाजात ती चेतना निर्माण केली. महाराष्ट्रतील शेकडो संतांनी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांनी हे काम केलंय. तर पुढे विवेकानंद यांनी हे काम सुरू ठेवले. स्वातंत्र्यपूर्वी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी देखील ही राष्ट्रीय चेतना वाढविली. त्यांनी 100 वर्षांपूर्वी ज्या वटवृक्षाचे बिजारोपण केले होते त्याने आज विशाल रूप धारण केले आहे. संघाचे हे वटवृक्ष आदर्श आणि सिद्धांतामुळे टिकले आहे असे मोदींनी सांगितले.
राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वटवृक्ष आहे. तसेच संघ एक अविरत चालणारा यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे. तर आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे. हे सेवा संस्कार, ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाचा प्राणवायू आहे. प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी याच्यातून प्रेरित होत आहे. त्याला निरंतर गतिमान ठेवते. त्यामुळे स्वंयसेवक कधीही थकत नाही, थांबत नाही. असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आपण पाहतो, डोंगराळ क्षेत्र असो, सागरी क्षेत्र असो, वनक्षेत्र असो, संघाचे स्वयंसेवक त्यांचे काम करत असतात. प्रयागराजमध्ये आपण पाहिले स्वयंसेवकांनी कशा पद्धतीने लाखो लोकांची मदत केली. जिथे सेवा कार्य तिथे स्वंयसेवक. नैसर्गिक आपत्ती असो, किंवा इतर कुठलेही संकट असो, स्वंयसेवक अनुशासित सैनिकासारखं तिथे पोहोचतात आणि सेवा भावनेतून काम करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतावर शेकडो वर्ष परकीय आक्रमन झाले. अनेक क्रुर आक्रमकांनी आमच्या देशाची सभ्यता आणि संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारतीयत्वाची मूळ जाणीव कधीच कुणी संपवू शकला नाही. भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि त्याची ज्वाला कायम तेवत ठेवण्यासाठी देशात अनेक चळवळींनी काम केले. त्यात भक्ती आंदोलनाचा मोठा वाटा आहे. आमच्या देशातील अनेक थोर संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीच विचारांची भावना कायम जिवंत ठेवण्याचे काम केले. समाजामध्ये असलेली दुरी संपवून सर्वांना एका सूत्रांमध्ये बांधण्याचे काम भक्ती आंदोलनाने केल्याचे मोदींनी सांगितले.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी