अमरावती, 15 एप्रिल (हिं.स.) ग्रामीण पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागासह मिळून जिल्ह्यातील २२ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जप्त असलेला ४७ लाख ७४ हजार रूपयांचा अवैध देशी-विदेशी दारूचा साठा नष्ट केला. अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या कोंडेश्वर येथील मैदानावर १३ एप्रिल रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली. जेसीबीने खड्डा खोदून इनकॅमेरा संपूर्ण दारू खड्डयात सोडण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्वच्छ ठेवण्यासाठी एक विशेष कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार एसीपी विशाल आनंद यांनी ग्रामीणच्या पोलिस ठाण्यात जप्त असलेला लावारीश भंगार माल व देशी, विदेशी दारूचा साठा नष्ट करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील २२ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून ४७ लाख ७४ हजार रूपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा मालखान्यांमध्ये पडून होता. हा दारूसाठी नष्ट करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी एक्साईज विभागासह मिळून जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी मंजूर केल्यानंतर अमरावती ग्रामीणचे अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, एलसीबीचे प्रमुख पीआय किरण वानखडे, इतर वरिष्ठ अधिकारी, २२ पोलिस ठाण्यातील मालखान्याचे प्रमुख यांनी एक्साईज विभागाचे अधिकारी प्रशांत वानखडे, संतोष वायाळ यांच्यासह मिळून १३ एप्रिल रोजी कोंडेश्वर येथील ग्रामीण पोलिसांच्या मैदानावर संपूर्ण दारूसाठी नष्ट केला. यासाठी मैदानाच्या एका भागात जेसीबीने मोठा खड्डा खोदण्यात आला आणि संपूर्ण इनकॅमेरा प्रक्रिया राबवून दारूसाठा खड्डयात नष्ट करण्यात आला. अमरावती ग्रामीणच्या अचलपुर पोलिसांनी १२ गुन्ह्यात, परतवाडा-३०, चांदुर बाजार -४०,शिरजगाव-२२, सरमसपुरा -७, मोर्शी-३०, बेनोडा-५३, शिरखेड-१२, नांदगाव खंडेश्वर-१०, माहुली-१८, खोलापुर-२२, कुऱ्हा-२०, चांदुर रेल्वे-६, तळेगाव-४६, मंगरूळ दस्तगीर-२१, येवदा-१७, खल्लार-२२, अंजनगाव -६३, पथ्रोट-८, रहिमापुर-१०, धारणी-३३, चिखलदरा पोलिसांनी २३ गुन्ह्यात हा संपूर्ण ४७ लाख ७४ हजारांचा दारूसाठा जप्त केला होता. ज्यामध्ये देशी दारूच्या १८० एमएलच्या २० हजार ९८८, देशी ९० एमएलच्या ४५ हजार ८८४ वइतर विदेशी दारूच्या २ हजार ५४० बॉटल्समधील दारू पोलिसांनी खड्डयात गाडून खड्डा बुझवून टाकला. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी