पुणे, 16 एप्रिल (हिं.स.)।
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची तळेगाव शाखा आपला २० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. यनिमित्त येत्या २४ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यंदाचा कलागौरव पुरस्कार हास्य जत्रा फेम अभिनेत्री नम्रता संभेराव व प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक व लेखक प्रसाद खांडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रमुख कार्यवाह विश्वास देशपांडे, सचिव संजय वाडेकर, संचालक सुरेश दाभाडे, राजेश बारणे, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.
वर्धापन दिन समारंभ २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६:३० वाजता सेवाधाम ग्रंथालया शेजारी नाना भालेराव कॉलनी, तळेगाव स्टेशन येथे संपन्न होणार असून, या समारंभाला प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे व आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु