सोलापूर, 16 एप्रिल (हिं.स.)।
एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा उजाडताच सोलापूरसह राज्यातील तापमानाचा पारादेखील उंचावला आहे. उन्हाची दाहकता वाढतच असून सोमवारी सोलापूरसह राज्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. शहर व परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचे उच्चांकी तापमान ४२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे.
दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागल्याने दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहेत. गेल्या ६ एप्रिलपासून सोलापूरचे कमाल तापमान सतत ४० अंशापेक्षा वरच आहे. सोमवारी पारा ४२.२ अंशापर्यंत गेला असून हा आतापर्यंतचा उच्चांक ठरला आहे. सोमवारी सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. सोलापूरसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात वाढ होत असल्याचे दिसून येते.
पुणे वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुन्हा अवकाळीचे ढग १५ एप्रिलदरम्यान येतील आणि सोलापूरसह राज्यातल्या काही भागातील वातावरणात पुन्हा बदल होऊन अवकाळीचे ढग दाटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा यासह हलका पाऊसही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड