रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : चाफे तिठा (ता. रत्नागिरी) येथे दुचाकीचालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला ट्रक जाळणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गेल्या मंगळवारी (दि. १ एप्रिल) सकाळी साडेअकराच्या सुमारास जाकादेवी ते चाफे रस्त्यावर चाफे तिठा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नीलेश सुरेश कळंबटे (वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जाकादेवी ते चाफे रस्त्यावर मंगळवारी ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये स्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील ट्रक व त्याच्यासोबत घासत आलेली दुचाकी चाफे तिठा येथे उभी होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सोबत पेट्रोल भरून आणलेल्या प्लास्टिकच्या बाटलीचे बूच काढून ते ट्रकच्या आत फेकून दिले आणि काडेपेटीच्या काडीने आग लावली. यामध्ये ट्रकसह दुचाकीही जळाली.
या प्रकरणी नीलेश कळंबटे यांनी जयगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नंदू बेंद्रे, संकेत ढवले, दीपक चौगुले अशी ट्रक जाळणाऱ्या संशयितांची नावे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी